- सुनील चरपेनागपूर : साेयाबीनचे पेरणीक्षेत्र देशात ५.२५ टक्के, तर राज्यात ४.५२ टक्क्यांनी घटल्याने उत्पादन घटण्याची, तसेच सप्टेंबरमध्ये अतिपावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पीक खराब हाेण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या साेयाबीनच्या दराने प्रतिक्विंटल सरासरी ५०० रुपयांची उचल घेतली असली तरी साेया ढेपेची संथ निर्यात, इथेनाॅल निर्मितीमुळे मका, गहू व तांदळाच्या ढेपेमुळे साेयाबीनचे दर एमएसपीपेक्षा कमी म्हणजेच प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांच्या आसपासच राहतील.
सरकारने सन २०२४-२५ च्या हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली असली तरी ऑक्टाेबर २०२४ ते मे २०२५ या काळात संपूर्ण देशभर साेयाबीनचे सरासरी दर ४,१०० रुपयांच्या आसपास हाेते. सरकारने एमएसपी दराने फार काही साेयाबीन खरेदी न केल्याने शेतकऱ्यांनी ते कमी दराने व्यापाऱ्यांना विकले.
मुळात साेयाबीनचे दर त्यातील तेलावर ठरत नसून, ते ढेपेवर ठरतात. या ढेपेचा वापर पाेल्ट्री व पशुखाद्य म्हणून केला जातो. जागतिक बाजारात भारतीय साेया ढेप व साेयाबीनच्या तुलनेत ब्राझील, अर्जेंटिनाच्या साेया ढेप व साेयाबीनचे दर कमी असल्याने भारताची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी साेयाबीनला किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळण्याची शक्यता मावळली आहे.
मका, गहू, तांदळाच्या ढेपेशी स्पर्धाकेंद्र सरकारने २१ डिसेंबर २०२३ राेजी इथेनाॅल निर्मितीसाठी मका, गहू व तांदळाच्या वापराला परवानगी दिल्याने या तिन्ही धान्याची ढेप माेठ्या प्रमाणात बाजारात यायला लागली. सध्या साेयाबीनच्या ढेपेचे ३० हजार ते ५० हजार रुपये प्रतिटन असून, मका, गहू व तांदळाची ढेप १६ हजार ते २२ हजार रुपये प्रतिटन दराने मिळत असल्याने पाेल्ट्री उद्याेग काेंबड्यांच्या खाद्यासाठी साेया ढेपेचा वापर कमी केला आहे.
पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर)
वर्ष | देश | राज्य | घट |
२०२४-२५ | १२५.११ | ५१.५९ | ६.५७ (५.२५ टक्के) |
२०२५-२६ | ११८.५४ | ४९.२६ | २.३३ (४.५२ टक्के) |
साेया ढेप निर्यात (लाख टन)
- २०२३-२४ - २३.३३
- २०२४-२५ - १८.००
- २०२५-२६ - ३.८७
- (२०२५-२६ या वर्षात एकूण १४ लाख टन साेया ढेप निर्यातीचा अंदाज)
साेयाबीन उत्पादन, एमएसपी, सरासरी दर (लाख टन/रुपये प्रतिक्विंटल)
वर्ष | उत्पादन | एमएसपी | सरासरी दर |
---|---|---|---|
२०२०-२१ | १०४.५६ | ३ हजार ८८० | ४ हजार १६६ |
२०२१-२२ | ११८.८९ | ३ हजार ९५० | ५ हजार ४९१ |
२०२२-२३ | १२४.११ | ४ हजार ३०० | ४ हजार ९५१ |
२०२३-२४ | ११०.०० | ४ हजार ६०० | ४ हजार १५० |
२०२४-२५ | १२३.६० | ४ हजार ८९२ | ४ हजार १७५ |