Join us

Soil Health : सेंद्रिय कर्ब व नत्र कमी, रासायनिक खतांचा भडिमार;'या' जिल्ह्यातील मातीचे आरोग्य धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 15:29 IST

Soil Health : रासायनिक खतांच्या अतिवापराने अकोल्यातील मातीचं आरोग्य ढासळलं आहे. शेतातील पोत बिघडला, नत्र व सेंद्रिय कर्ब टंचाईत गेले. उत्पादन घटलं, खर्च वाढला. शेतकऱ्यांनी वेळेत सावध होऊन सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे, असं माती परीक्षणातून समोर आलंय. जमिनीच्या श्वासाला पुन्हा हिरवा रंग द्यायचा असेल, तर जमिनीची काळजी घ्या. (Soil Health)

विवेक चांदूरकर

रासायनिक खतांचा भरमसाट वापर व कीटकनाशकांच्या भडिमारामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात करण्यात आलेल्या माती परीक्षणाच्या अहवालावरून मातीतील सेंद्रिय कर्ब व नत्राचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. (Soil Health)

त्यामुळे उत्पादनात घट येत असून, खतांचा वापर जास्त करावा लागत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.(Soil Health)

जिल्ह्यात वैयक्तिक फळबाग तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतातील मातीचे परीक्षण दरवर्षी करण्यात येते.अकोला जिल्ह्याला २०२५-२६ करिता ३५ हजार माती नमुने परीक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. (Soil Health)

सहायक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेतातील नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. मातीच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्याची अत्यंत कमी, मध्यम, भरपूर, अत्यंत भरपूर, अशी वर्गवारी करण्यात येते. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत मातीच्या १२०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. (Soil Health)

या नमुन्यांच्या अहवालामध्ये मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात ०.३९ ते ०.४५ आढळले आहे, तसेच नत्राचे प्रमाण ०.०१ आहे. नत्राचे प्रमाणसुद्धा कमी आहे. गत काही वर्षापासून शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे, तसेच कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.(Soil Health)

१,२०० नमुन्यांची तपासणी

अकोला जिल्ह्याला २०२५ - २६ करिता ३५ हजार माती नमुने परीक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी १२०० नमुन्यांची १८ जुलैपर्यंत तपासणी करण्यात आली आहे. दररोज सहा कृषी अधिकारी व शेतकऱ्यांच्या माध्यमातून मातीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणण्यात येतात.

अकोट, तेल्हारा तालुक्यात अन्य तालुक्यांपेक्षा जास्त प्रमाण

अकोला व तेल्हारा तालुक्यातील माती नमुन्यांची तपासणी केली असता मातीमध्ये सेंद्रिय कर्ब व नत्राचे प्रमाण अन्य तालुक्यांपेक्षा जास्त आढळले आहे. मात्र, तेही प्रमाण कमी आहे.

या भागात शेणखताचा वापर करण्यात येतो, तसेच जलपातळी चांगली आहे. जनावरांचे प्रमाणही जास्त आहे. मूर्तिजापूर, अकोला व पातूर तालुक्यात मात्र सेंद्रिय कर्ब व नत्राचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

रासायनिक खतांमुळे तात्पुरते वाढतात अन्नद्रव्य

शेतात रासायनिक खत टाकल्यामुळे अन्नद्रव्य तात्पुरते वाढतात. मात्र, कायमस्वरूपी त्यात वाढ होत नाही. शेतात सेंद्रिय खत टाकले तर त्याद्वारे सूक्ष्मजीव तयार होते. मातीचे नैसर्गिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

अकोला जिल्ह्यात मातीमधील सेंद्रिय कर्ब व नत्राचे प्रमाण कमी होत चालले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतात शेणखत देणे, हिरवळीचे खत देणे, कंपोस्ट देण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकरी रासायनिक खत देतात. त्यामुळे तात्पुरते मूलद्रव्ये मिळतात. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नाहीत. जिल्ह्यात पालाशचे प्रमाण व्यवस्थित आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी आहे. - ज्योती चोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, अकोला.

हे ही वाचा सविस्तर : Banana Farming : हवामान बदलातही आधुनिक शेतीचा आदर्श; दर्जेदार केळीची निर्यात वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीअकोला