- सुनील चरपेनागपूर : राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत सन २०२०-२१ मध्ये सुरू केलेला स्मार्ट काॅटन (Smart Cotton) प्रकल्प अवघ्या चार वर्षांनंतर गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कापसाचे उत्पादन (Kapus Utpadan), गुणवत्ता, मूल्यवर्धन व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प सुरू ठेवणे गरजेचे आहे.
कृषी विभागातील ‘आत्मा’ आणि कापूस उत्पादक (Cotton Farmers) पणन महासंघाचा सक्रिय असलेला हा प्रकल्प राज्यातील कापसाचे उत्पादन, गुणवत्ता व कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने कापसाचे मूल्यवर्धन करण्यासाठी अस्तित्वात आला. यात शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या मार्फत ‘एक गाव, एक वाण’ हा प्रयाेग करण्यात आला. या शेतकरी गटांनी कापूस थेट बाजारात विकण्याऐवजी कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करून म्हणजेच रुईच्या गाठी व सरकी विकायला सुरुवात केली. या प्रयाेगामुळे कापसाला बाजारभावापेक्षा अधिक दर मिळाला, अशी माहिती भानुदास बाेधाने यांच्यासह शेतकऱ्यांनी दिली.
विस्तारीकरणाला ब्रेकहा प्रकल्प सन २०२३-२४ पर्यंत विदर्भातील, अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व खानदेशातील जळगाव या १२ जिल्ह्यांत यशस्वीपणे राबविण्यात आला. सन २०२४-२५ मध्ये या प्रकल्पाचा विस्तार करण्याऐवजी यातील पाच जिल्हे कमी केले. त्यामुळे हा प्रकल्प सध्या अकाेला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या सात जिल्ह्यात राबविला जात आहे.
५०.१८ काेटींची तरतूद२०२०-२१ ते २०२६-२७ या कालावधीसाठी कापूस मूल्यसाखळी विकास शाळा प्रशिक्षण व विस्तार घटकांतर्गत २८.९८ कोटी तसेच प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाकॉट व प्रकल्प अंमलबजावणी यासाठी २१.२० कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्यातील १,८१९ गावांमध्ये ८० शेतकरी गटांनी रुईच्या ९,४५४ गाठींची निर्मिती केली.
हा प्रकल्प बंद न करता, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कापसाला प्रतिएकर प्राेत्साहन निधी द्यावा. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी या प्रकल्पात सघन व अतिघन कापूस लागवडीचा अवलंब करावा.- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ.
या प्रकल्पात सुधारणा कराव्यात. आधी निवडक गावांमध्ये प्रयाेग करून त्याचा विस्तार करावा. प्रकल्प बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हाेईल.- भानुदास बाेधाने, कृषिक्रांती शेतकरी गट, काेंढाळा, जिल्हा चंद्रपूर.