Join us

...म्हणून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 9:25 AM

नाशिक जिल्ह्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांना महासन्मान योजनेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नाशिक : केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. परंतु, योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे बंधकारक असतानाही जिल्ह्यातील साडेसहा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी पूर्ण केलेली नाही. अशा अपात्र शेतकऱ्यांना महासन्मान योजनेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, इगतपुरी, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला तालुक्यांतील ४ लाख ३९ हजार ३५६ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ४ लाख ३२ हजार ४७० शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे. तर अद्याप ६ हजार ८८६ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्यांचा हप्ता व राज्याचा हप्ता गोठविण्यात येणार आहे.

किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात होता. आता नव्याने नमो महासन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी लवकरच निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

- भगवान गोरदे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

कोण आहेत अपात्र शेतकरी...

'नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी प्रकिया पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत पंधरा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करीत ९८ टक्के काम केले आहे, तर मालेगावसह बारा तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी पूर्ण केलेली नाही. परंतु, काही शेतकऱ्यांनी केवळ गुंतवणुकीसाठी शेती घेऊन ठेवली आहे, तर काहींचे स्थलांतर झाल्याने अशा शेतकऱ्यांपर्यंत संपर्क होऊ शकत नाही. ग्रामपंचायतीकडून संबंधित शेतकयांना केवायसी - करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

केवायसी पूर्ण असेल तरच नियमित हप्ता

किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ६ हजार रुपये अनुदान मिळते. यात आणखी ६ हजारांची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. १० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती