शरद वाघमारे
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र आनंदोत्सव सुरू असताना, शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी मात्र टोकाची भूमिका घेतली आहे. शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अन्यथा सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हे निवेदन नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले असून, त्यावर तब्बल २०० शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.(Shaktipeeth Mahamarg)
नांदेड जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी गेल्या पावणेदोन वर्षांपासून या महामार्गाला तीव्र विरोध करीत आहेत. पूर्णा व अप्पर पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपीक, बागायती आणि उत्पादनक्षम जमीन वाचविण्यासाठी हा लढा सुरू आहे. (Shaktipeeth Mahamarg)
विशेषतः अर्धापूर तालुक्यातील केळी, हळद यांसारखी पिके थेट परदेशात निर्यात होतात. या समृद्ध कृषी पट्ट्यातून महामार्ग गेल्यास शेती उद्ध्वस्त होईल, शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि स्थानिक रोजगारावरही गंभीर संकट येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.(Shaktipeeth Mahamarg)
महामार्गासाठी आरेखन व मोजणीच्या नावाखाली अनेक वेळा शासकीय पथके गावांमध्ये दाखल झाली. मात्र शेतकऱ्यांनी संघटितपणे या पथकांना विरोध करून परतवून लावले आहे. असे असतानाही शासन दमनकारी मार्गाने मोजणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करत थेट सामूहिक इच्छामरणाचा इशारा दिला आहे.(Shaktipeeth Mahamarg)
दरम्यान, शासनाने नुकतेच विधानसभेत सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्या ठिकाणी जवळच समांतर महामार्ग उपलब्ध असल्यामुळे आरेखन बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
याच न्यायाने नांदेड जिल्ह्यातही शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन बदलावे, अशी कळकळीची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांच्या परिसरातून प्रस्तावित महामार्गाच्या अवघ्या ३ ते ८ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ (नागपूर–रत्नागिरी) समांतरपणे अस्तित्वात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने वेळीच निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांसमोर सामूहिक इच्छामरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, अशी भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी, गजानन तीमेवार, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ यांच्यासह विठ्ठलराव गरुड, पराग अडकिने, प्रदीप गावंडे, ज्ञानोबा हाके, अनिल चव्हाण, बापूराव ढोरे, ईश्वर सवंडकर, दिलीप कराळे, धोंडीराम कल्याणकर, सतीश देसाई, बालाजी इंगोले, सुभाष कदम, तुकाराम खुर्दा मोजे, सोनाजी बुट्टे, माधव इंगोले, शंकर तिमेवार, सुरज मालेवार, आनंदराव नादरे, दिलीप भिसे यांच्यासह अनेक बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
Web Summary : Farmers in Nanded, affected by the Shaktipeeth Mahamarg, demand its cancellation, threatening mass euthanasia. They protest the highway's impact on fertile land and livelihoods, citing a viable alternative route. They submitted a petition signed by 200 farmers.
Web Summary : नांदेड के किसानों ने शक्तिपीठ महामार्ग रद्द करने की मांग की है, ऐसा न होने पर सामूहिक इच्छामृत्यु की धमकी दी है। वे उपजाऊ भूमि और आजीविका पर राजमार्ग के प्रभाव का विरोध करते हैं, एक व्यवहार्य वैकल्पिक मार्ग का हवाला देते हैं। २०० किसानों द्वारा हस्ताक्षरित याचिका सौंपी।