Join us

Water crisis : 'आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या घरातलं', हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या महिला 

By गोकुळ पवार | Published: April 11, 2024 2:10 PM

सकाळी उठल्यापासून या महिला नदीच्या पोटाला जाऊन झिऱ्यावरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. 

नाशिक : "जनावरां तरी बरी असा आमचा जगणं झालाय, सकाळीच पहिला पाण्याचा काम करायचा, मग सयपाक अन् बाकी काम', कधी कधी अख्खा दिवसच पाण्यासाठी थांबावं लागतंय, पाण्यासाठीच दिवस घालवला तर मजुरीचं काय? अन् कामावरच न्हाय गेलू त खायचा काय, अशी परिस्थिती झालीय...' असा एकंदरीत पाण्यासाठीचा संघर्षच डोक्यावर हंडा घेऊन घराची वाट कापत जाणाऱ्या आजीबाईने कथन केला. ही परिस्थिती आहे, त्र्यंबकेश्वर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरपाडा या गावातील महिलांची. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

आजही उन्हाळा म्हटला कीं ग्रामीण भागातील पहिली समस्या निर्माण होते ती म्हणजे पाण्याची. दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना एक-एक दोन-दोन किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे पाण्याचे महत्व आणि पाण्याची खरी किंमत ही महिलांना नेमकी समजली आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वदूर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरपाडा गावात अशीच काहीशी परिस्थिती असून सकाळी उठल्यापासून दोन हांडे डोक्यावर घेऊन या महिला नदीच्या पोटाला जाऊन झिऱ्यावरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. 

इथे पहा Video :पाण्याची किंमत 'या' महिलांना विचारा, हंडाभर पाण्यासाठी केवढा संघर्ष

बोरपाडा ही शंभर ते दोनशे लोकांची लोकवस्ती असून दरवर्षीं प्रमाणे यंदाही या पाड्यावर भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येथील महिला अक्षरशः हतबल झाल्या असून 'कधी कुठून कसं पाणी येईल' याची वाट पाहत असल्याचे त्यांच्या एकूण देहबोलीवरून जाणवले. देवकाबाई म्हणाल्या की, 'सकाळी उठलो, पहिलं पाण्याचं काम करावं लागतं, नंतर दुसरं... दरवर्षीं आमच्या नशिबी पाण्यासाठी वणवण आहेच, कधी थांबणार हे....ज्या विहिरीला पाणी होत, ती आटली आता थेट झिऱ्यावर जाऊन पाणी आणावं लागतं, ते इतकं सोप्प नाही. अख्खा दिवस निघून जातो.. अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. म्हणेजच 'सकाळी पाच वाजता उठायचं, डोक्यावर हांडे घेऊन झिऱ्याकडचा रस्ता कापायचा. झिऱ्यात पाणी आहे कि नाही बघायचं... तासभर वाट पाहिल्यानंतर झिऱ्यात पाणी झिरपून येत असत. त्यानंतर तेच पाणी सोबत आणलेल्या गाळणीने गाळून घरी घेऊन यायचं, असा हा ठरलेला दिनक्रम... 

तर दुसऱ्या सुमनबाई म्हणाल्या की, महिलांचाच नशिबी ही परवड... आमची लग्न झाली तेव्हापासून आम्ही हेच जिणं जगत आलोय. कधी थांबायचं हे... आता इथून मुली लग्न करून जात्यात, पण गावातल्या मुलांना कुणी मुलगी देईना झालंय, म्हणत्यात तुमच्या गावात पाणी न्हाय, पोरी कशा देयाच्या, गावात पाणी आणा, म पाहू... गावातल्या बायांनी किती वेळा पाण्यासाठी भांडण केलं, पण कुणीच मनावर घेईना झालंय, करायचं तर काय? म्हणून गावात कुठलंय काम करण्याआधी पाण्याचं काम करा म्हणतोय, मगच दुसरं काम करायला सांगतोय, गावात पाणी आलं तर सगळं चांगलं होईल, असा आशावाद देखील येथील महिलांनी व्यक्त केला. 

महिलांची जीवघेणी कसरत 

त्र्यंबकेश्वर-हर्सूल रस्त्यावरील वेळुंजे गावापासून घाटातून नांदगाव कोहळीकडे गावाकडे यावं लागतं. यानंतर उजव्या बाजूला असलेल्या रस्त्याने वैतागवाडी गावावरून आपण वारसविहीर गावापर्यत पोहचतो. याच गावाच्या ग्रुप ग्रामपंचायतपैकी बोरपाडा हे शंभर दोनशे लोकवस्तीचं गाव आहे. वरसविहीर गाव ओलांडल्यानंतर लागलीच बोरपाड्याचा रस्ता आपल्याला दिसू लागतो. कधी सकाळच्या सुमारास तर कधी सायंकाळी तर कधी रात्री बेरात्री देखील येथील महिलांना पाण्यासाठी झिऱ्यावर यावं लागतं. गावापासून खाली ५०० ते एक किलोमीटर दरीत नदी आहे, या नदीच्या पोटाला हा झिरा आहे. यासाठी महिलांना खाली उरातून जावं लागत. शिवाय पाणी घेऊन येताना छातीवर डोंगर येत असल्यासारखी वाट भासते. अशा स्थितीत जिथं पाणी आहे, तो मुळात हा पाच फुटांचा खड्डा भरण्यास काही वेळ लागतो. पुन्हा हंडा भरायचा म्हटला की, अर्धा ते पाऊण तास निघून जातो. त्यामुळे एकावेळी पंधरा ते वीस हांडे झिऱ्यावर येत असतात. अशावेळी दोन ते अडीच तास थांबून पाणी भरावे लागते. अशी येथील महिलांचा कसरत आहे. 

टॅग्स :नाशिकशेतीपाणीत्र्यंबकेश्वरपाणी टंचाई