धाराशिव : रेशीम शेतीमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण व आर्थिक मदत देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे मत पालक सचिव अंशू सिन्हा यांनी व्यक्त केले. (Sericulture Farming)
कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील प्रगतशील रेशीम शेतकरी शिवलिंग कुंभार यांच्या तुती बाग व कीटक संगोपन गृहास महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या पालक सचिव अंशू सिन्हा आणि रेशीम विभागाच्या उपसचिव कोचरेकर यांनी भेट दिली. (Sericulture Farming)
सिन्हा यांनी यावेळी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रेशीम शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत रेशीम शेतीच्या उन्नतीसाठी उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. (Sericulture Farming)
भेटीदरम्यान तुतीच्या झाडांची लागवड, कीटक संगोपन प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी उत्पादन खर्च, प्रशिक्षण, सरकारी अनुदाने, कीटकांवरील आजार व बाजारपेठेतील अस्थिरता यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. (Sericulture Farming)
या दौऱ्यात जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, सोलापूरचे रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, रेशीम विकास अधिकारी ए. व्ही. वाकुरे, कळंब तालुका क्षेत्रसहायक एस. एच. सूर्यवंशी, तांत्रिक सहाय्यक जुनेद उस्मानी, रेशीम प्रगतीशील शेतकरी बापू नेहाने यांच्यासह परिसरातील अनेक रेशीम शेतकरी उपस्थित होते. (Sericulture Farming)
रेशीम शेतीसाठी शासन कटिबद्ध...
* रेशीम शेती ही पर्यायी उत्पन्नाचा उत्तम स्रोत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तुती लागवड, कीटक संगोपन गृह उभारणी, प्रशिक्षण शिबीर, बाजारपेठेचा थेट संपर्क या गोष्टी सक्षमपणे राबविल्या जातील, असा विश्वास यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिला.
* या दौऱ्यामुळे रेशीम शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे येत्या काळात धाराशिव जिल्ह्यातील रेशीम शेतीला मोठे बळकटीकरण लाभणार आहे.