मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शासनाच्या उदासीनतेचा जाब विचारण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील धानोरा बु येथील पदवीधर शेतकरी सहदेव होनाळे यांनी आपल्या खांद्यावर नांगर आणि पाठीवर बॅग घेऊन थेट विधान भवनाच्या दिशेने पायी दिंडी सुरू केली आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता धानोरा येथून निघालेल्या सहदेव होनाळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
हडोळतीच्या पवारांच्या कहाणीने हेलावले मन
संपूर्ण महाराष्ट्राला व्यथित करणाऱ्या हडोळती (अहमदपूर) येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांच्या कहाणीने शेतकरी सहदेव होनाळे यांना धक्का दिला.
स्वतःच्या खांद्यावर जोखड (औत) घेऊन शेतात नांगरणी करणारा पवारांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी ठरवले की, प्रत्येक शेतकऱ्यानेच जर स्वतःच्या खांद्यावर नांगर घ्यायचा असेल, तर सरकार आणि लोकप्रतिनिधी काय करणार?
मातीशी नाळ जोडलेला पदवीधर शेतकरी
सहदेव होनाळे हे पदवीधर असूनही मातीशी नाळ जोडून राहिले आहेत. तीन भावांत वाटून मिळालेल्या साडेनऊ एकर वडिलोपार्जित जमिनीतून १३ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना पिढ्यानपिढ्या शेतीचीच कास धरावी लागली. अनेक आंदोलने, निदर्शने करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष न गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारची आश्वासने
मराठवाड्यातील अत्यल्प पावसाळा, शेतीमालाला मिळणारे तुटपुंजे भाव, कर्जमाफीची प्रतीक्षा, आधारभूत किंमत योजनेखालील मालाची न खरेदी, मनरेगाचे थकित पैसे अशा असंख्य समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. या प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी केवळ आश्वासनेच दिली जातात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
विधान भवनाकडे पायी प्रवास सुरू
शेतकऱ्यांच्या जखमा मुख्यमंत्री आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायच्या आहेत. शेतकऱ्यांचे जीवनही आनंदी आणि सन्मानाने व्हावे, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगत सहदेव होनाळे यांनी मुंबईकडे पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. शनिवारी ते बीड जिल्ह्यातील केज येथे पोहोचले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच्या खांद्यावर नांगर घ्यावा लागेल का? असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकारला जाग करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कुटुंबाची जबाबदारी
सहदेव होनाळे यांच्या कुटुंबात आई, पत्नी, मुले, भावंडांसह एकूण १३ जण आहेत. शेतीतूनच घर चालवायचे असल्याने त्यांची अडचण अधिक गंभीर बनली आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. नुसती भाषणे आणि जाहिराती पुरेशा नाहीत, अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.