Join us

नाशिक जिल्ह्यात रिचार्ज शफ्ट पद्धतीचा अवलंब, भूजल पातळी वाढविण्यासाठी घोरवड पॅटर्न  

By गोकुळ पवार | Published: December 03, 2023 1:44 PM

सिन्नर तालुक्यातील घोरवाड या ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज शफ्ट हा पॅटर्न राबविला होता.

Nashik : एकीकडे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय भूजल मंडळाकडून नाशिकच्या सिन्नर तालुक्यात रिचार्ज शफ्ट पद्धतीचा अवलंब  करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पद्धतीमुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे देखील समोर आल्याने हा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक भागात आजही टँकर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय भूजल मंडळाचे पथक नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे. या पथकाने सिन्नर तालुक्यातील घोरवाड या ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज शफ्ट हा पॅटर्न राबविला होता. हा पॅटर्न लागू पडला असून आत पथकाने पाहणी केल्यानंतर या परिसरात भूजल पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे घोरवड पॅटर्न हा जिल्हाभर राबविण्याच्या सूचना त्यांनी या वेळी ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेला दिल्या. त्यामुळे आता जिल्हाभर हा पॅटर्न राबविण्यात येऊन पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. 

यंदाचा पावसाळा संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यात भूजल पातळीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले होते. त्यावेळी जलशक्ती अभियानाच्या अनुषंगाने भूजल पातळीत वाढ करण्यासाठी अनेक गावांना रिचार्ज शफ्टचा उपक्रम राबविण्यात आला. त्यापैकी इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील गावांना केंद्रीय पथकाने भेटी दिल्या. यात घोरवड येथेही या पद्धतीचा वापर करण्यात आला. यामुळे येथील भूजल पातळीत वाढ झाल्याचे पथकाला दिसून आले. तसेच इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, गोंदे गावातही विहिरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान रिचार्ज शफ्ट पद्धतीचा चांगला परिणाम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांत हा पॅटर्न राबविल्यास पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होऊ शकते, असे सूतोवाच पथकाकडून देण्यात आले. 

काय आहे रिचार्ज शफ्ट पद्धती 

हळूहळू पाण्याचा कमतरता भासू लागली आहे. दुसरीकडे पाण्याचा वापर वाढल्याने भूगर्भातील पाणीपातळी देखील खालावत चालली आहे.  म्हणून वनराई बंधारे, केटी बंधारे, कूपनलिकेच्या माध्यमातून पाणी अडवूं मुरवले जात आहे. त्यातलाच रिचार्ज शफ्टचा पर्याय अवलंबला जात आहे. अगदी शून्य बजेट मध्ये हा पर्याय आहे. या पद्धतीत कूपनलिका घेऊन भूगर्भात पाणी मुरविले जाते. यामुळे भूजल पातळी वाढून आसपासच्या विहिरी, कूपनलिका आदी नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना रिचार्ज शफ्ट योजनेच्या माध्यमातून पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :नाशिकपाऊसदुष्काळ