Join us

RBI Policy Farmer Loan : आता विनातारण मिळणार 2 लाखांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेने घेतला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 20:36 IST

RBI Policy Farmer Loan : शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

RBI Policy Farmer Loan : देशातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Policy Farmer Loan) शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा (Collateral Loan) वाढवली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख 60 हजार रुपये इतकी होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा दिलासादायक मानला जात आहे. आता ज्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जाची आवश्यकता असेल ते कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळवू शकतात. त्यासाठी ओळख आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे बहुतांश शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आता कर्जाची मर्यादा वाढविण्यात असल्याने शेतकऱ्यांना अधिकचे कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. 

काय असतं विनातारण कर्ज योजना? विनातारण कर्ज योजना हे असं कर्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण जमा करावी लागत नाही. सर्वसाधारणपणे कर्जाचे दोन प्रकार आहेत. प्रथम असुरक्षित (वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डवरील कर्ज), ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे गृह कर्ज, कार कर्ज, सुवर्ण कर्ज, व्यवसाय कर्ज यासारखे सुरक्षित कर्ज. ते घेताना बँक तुमच्याकडून सुरक्षा घेते. 

महागाईच्या घोड्याला लगाम घालावी लागेल

आरबीआयने आगामी आर्थिक वर्षासाठी महागाई दराचे अनुमान ४.५ टक्के वरून वाढवून ४.८ टक्के इतके केले आहे. महागाईच्या घोड्याला लगाम घालण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे दास म्हणाले. खरिपातील चांगली लागवड, सिंचनासाठी पुरेसे पाणी यामुळे शेतीविकासाला हातभार लागणार आहे, असे ते म्हणाले.

रोकड वाढल्याने बँकांना अधिक लोकांना देता येईल कर्ज

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत बँकांसाठी कॅश रिझर्व्ह रेश्यो म्हणजेच सीआरआरमध्ये ०.५ टक्के इतकी घट केली आहे. ४.५ इतके इतका असलेला सीआरआर ४ टक्के केल्याने बँकांजवळील रोकड वाढणार आहे. बँकांजवळ आधीच्या तुलनेत यापुढे जादा रोकड उपलब्ध होणार आहे. आता बँकांना १.१६ लाख कोटींची २ अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. यामुळे अधिकाधिक खातेधारकांना बँका कर्ज देऊ शकतील. बाजारातील रोकड नियंत्रणात राहण्यासाठी यात वेळोवेळी बदल केले जातात.

स्मॉल फायनान्स बँकामध्ये यूपीआय क्रेडिट लाइन

बँक खात्यात पैसे नसले तरी यूपीआयने पेमेंट करण्याची क्रेडिट लाइन सुविधा आता स्मॉल फायनान्स बँकांकडूनही ग्राहकांना दिली जाणार आहे. यामुळे आता जास्तीत जास्त लोकांना या सुविधेचा लाभ होईल, असे आरबीआयने म्हटले आहे. या सेवेची सुरुवात सप्टेंबर २०२३ मध्ये झाली होती. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या शेड्युल कमर्शिअल बँकांकडून ही सुविधा दिली जात होती. ही सुविधा देण्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची भूमिका महत्त्वाची असते. लहान शहरे तसेच ग्रामीण भागातील लोकांना यामुळे लाभ होणार आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपीक कर्जशेती क्षेत्रशेतीशेतकरी