Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rabi Crop: बहरलेल्या रब्बी पिकांवर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी अस्वस्थ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:42 IST

Rabi Crop : रब्बी हंगामात बहरलेल्या पिकांवर नीलगाय, रानडुक्कर आणि वानरांनी धुमाकूळ घातला असून जंगलालगतच्या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रंदिवस रखवाली करूनही पिके सुरक्षित राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. (Rabi Crop)

Rabi Crop : रब्बी हंगामात बहरलेल्या पिकांमध्ये नीलगाय, रानडुक्कर आणि वानर यांसारख्या वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.(Rabi Crop)

रात्री-अपरात्री शेतात रखवाली करूनही पिके सुरक्षित राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. विशेषतः जंगलालगत असलेल्या भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.(Rabi Crop)

खामगाव तालुक्यातील ढोरपगाव, भालेगाव, काळेगाव, रोहणा, वर्णा, पिंप्राळा, पिंप्री गवळी, आवार, टेंभुर्णा या गावांसह जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या जामोद, सुनगाव, उमापूर, निमखेडी, गारपेट या गावांतील शेतकरी या संकटाला तोंड देत आहेत.(Rabi Crop)

या भागांत उभ्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

रात्रीच्या वेळी अधिक नुकसान

रात्रीच्या सुमारास नीलगाय, रानडुक्कर आणि वानरांचे टोळके शेतात घुसून पिके तुडवतात, उखडतात आणि नष्ट करतात. काही ठिकाणी संपूर्ण शेतातील पीकच उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.

कांदा, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर बाधित होत असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

रात्रंदिवस रखवाली करूनही तोटा

शेतकरी रात्रभर शेतात थांबून काठ्या, कंदील, आवाज करून प्राणी हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वन्य प्राण्यांच्या टोळ्यांपुढे शेतकऱ्यांचा निभाव लागत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक वेळा जीव धोक्यात घालून पीक वाचवण्याचा प्रयत्न करावा लागत असल्याने शेतकऱ्यांवर मानसिक ताणही वाढत आहे.

जंगलालगतच्या गावांत संकट अधिक तीव्र

सातपुडा पर्वतरांगालगत असलेल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. जंगलातून बाहेर पडणारे प्राणी थेट शेतात शिरत असल्याने नुकसानाचे प्रमाण जास्त आहे. वारंवार वनविभाग आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सौर कुंपण उभारणे, संरक्षणात्मक जाळ्या उपलब्ध करून देणे, वन्यप्राणी प्रतिबंधक साधने बसवणे तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित व न्याय्य भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

रात्रभर शेतात जागूनही नीलगाय आणि रानडुकरांचा बंदोबस्त होत नाही. मेहनतीने उगवलेले पीक डोळ्यादेखत नष्ट होत आहे. नुकसानभरपाई मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. - मनीष गवई, शेतकरी

रब्बी हंगामात पिके हातात येण्याच्या टप्प्यावर असताना वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, तातडीच्या संरक्षणात्मक उपाययोजनांची नितांत गरज असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Rabi Crop Fertilizer Crisis : रब्बीच्या मध्यावर खतसंकट; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

English
हिंदी सारांश
Web Title : Wild animals wreak havoc on Rabi crops, farmers distressed.

Web Summary : Wild animals, including nilgai and wild pigs, are destroying Rabi crops in Khamgaon and Jalgaon Jamod, causing significant losses for farmers. Farmers are demanding immediate protective measures and compensation from the forest department and administration.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकरब्बी हंगाम