Join us

Agri Education : विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण हे प्रात्यक्षिक आणि सुलभ पद्धतीने द्या; कृषिमंत्र्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:39 IST

Agri Education : राज्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण हे प्रात्यक्षिक स्वरूपात आणि सुलभ पद्धतीने देण्यात यावे..

Agri Education : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (Maharashtra Agricultural Education and Research Council) पुणेची ११८ वी बैठक कृषी परिषद पुणे येथे पार पडली. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून कृषी शिक्षण आणि कृषी संशोधनाच्या पुढील कामकाजाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या (Agriculture University) विविध विभागांच्या विषयांची माहिती घेऊन पुढील कामकाजासाठी मंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच विद्यापीठांनी संशोधित केलेले तंत्रज्ञान हे शेतकरीभिमुख असावे आणि शेतकरी हा विद्यापीठाच्या संशोधनाचा केंद्रबिंदू असावा अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण हे प्रात्यक्षिक स्वरूपात आणि सुलभ पद्धतीने देण्यात यावे, तसेच कृषी विद्यापीठाच्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार जलद गतीने व्हावा, अशाही सूचना दिल्या. तसेच कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत आणि कृषी व संलग्न क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी उपसमिती गठित करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या समितीत कृषी परिषदेचे शिक्षण संचालकांसह कृषी विद्यापीठांमधील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

कृषी विस्तारात विद्यार्थ्यांना इंटर्नशिप

कृषी शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना कृषी विस्ताराच्या कामात इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात यावी. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी व मंडल कृषी अधिकारी कार्यालयातील कामावर भर द्यावा. ई-पीक पाहणी व अन्य कामांमध्ये त्यांची मदत घेता येईल आणि प्रति शेत त्यांना मानधनही देण्याबाबतचा समावेश करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशिक्षणमाणिकराव कोकाटे