Join us
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती शक्य, सहावीत शिकणाऱ्या तन्वीचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:35 IST

Organic Fertilizer : हा प्रयोग केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही, तर जमिनीचा कस वाढवणारे उत्तम खतही उपलब्ध करून देतो.

- अमरचंद ठवरेस्टीकसह इतर कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या कचऱ्यांमुळे मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. त्यात सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याच्या समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या कचऱ्याचे विघटन करायचे कसे, यावर विविध प्रयोग केले जात आहेत. मात्र, समस्येवर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या तन्वी परशुरामकर या विद्यार्थिनीने उपाय शोधून काढला आहे.

पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तिने बायोडिग्रेडेबल नॅपकिन्सपासून खतनिर्मिती हा प्रयोग केला आहे. जगभरात दरवर्षी सुमारे ४५ अब्ज सॅनिटरी नॅपकिन्स कचऱ्यात फेकले जातात. एकट्या भारतात दरमहा १ अब्ज नॅपकिन्स कचरा डेपोमध्ये जमा होतात, प्लास्टिकयुक्त नॅपकिन्स निसर्गात नष्ट होण्यासाठी ८०० वर्षे लागतात. 

ही भयावह स्थिती लक्षात घेता तन्वीने पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल (जैविक विघटनशील) नॅपकिन्सच्या वापराला प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या विल्हेवाटीतून संपत्ती निर्माण करणारा प्रयोग सादर केला. प्रयोगासाठी तन्वीने एक विशेष इन्सुलेटेड एरोबिक बायोरिॲक्टर तयार केला. दोन थरांच्या या यंत्रात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी भुसा आणि थर्माकोलचे आवरण दिले आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी १२ व्होल्टचा डीसी फॅन बसविला. 

वापरलेल्या बायोडिग्रेडेबल नॅपकिन्सना ड्रायरच्या साह्याने त्यांच्यामधील पाण्याचे प्रमाण कमी करून छोटे तुकडे तयार करण्यात आले. ज्यामुळे विघटनाचा वेग वाढण्यास मदत झाली. विघटनाचा वेग आणखी वाढविण्याकरिता त्यात परिसरातील ओला कचरा पालापाचोळा शेणकाला आणि गुळाच्या द्रावणाचा वापर केला. गुळामुळे जिवाणूंना ऊर्जा मिळाली आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढली. इन्सुलेशनमुळे रिअॅक्टरमधील तापमान ५५ अंश सेल्सिअस ते ६० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. 

या उच्च तापमानामुळे सॅनिटर नॅपकिन्सचे पूर्णतः विघटन झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार त्यातील सर्व हानिकारक जंतू नष्ट झाले. अवघ्या ४५ दिवसांत कचऱ्याचे रूपांतर काळ्याभोर दर्जेदार, दुर्गंधीरहित आणि पोषक अशा सेंद्रिय खतात झाले. सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनांसह त्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसुद्धा शक्य असल्याने तन्वीने आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखविले.

कचऱ्यांतून संपत्तीशाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅड्सची व्यवस्था असावी. वापरलेल्या बायोडिग्रेडेबल नॅपकिन्ससाठी शाळेतच बायोरिअॅक्टर बसविला जावा. या रिअॅक्टरमधून तयार होणारे खत शाळेच्याच परसबागेतील झाडांना आणि भाज्यांना वापरले जावे. अशा प्रकारे शाळेतील कचरा शाळेतच जिरवून त्यातून निसर्ग फुलवता येईल, अशी ही कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणारी साखळी तन्वीने शास्त्रोक्त पद्धतीने मांडली. विशेष म्हणजे ८०० वर्षाची ही समस्या शून्य दिवसात संपू शकते. हा प्रयोग केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही, तर जमिनीचा कस वाढवणारे उत्तम खतही उपलब्ध करून देतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanitary napkin waste transforms to organic fertilizer: Sixth-grader's successful experiment.

Web Summary : Sixth-grader Tanvi Parshuramkar found a solution for sanitary napkin waste. She created fertilizer from biodegradable napkins using a bioreactor, reducing waste and producing valuable compost in 45 days. This innovation offers a sustainable waste management approach.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनाखते