नाशिक : सूर्यापासून वीज निर्मिती करता यावी यासाठी पंतप्रधान सूर्यघर योजना आणली आहे. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्यांना अनुदानही मिळणार आहे. मात्र या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक अटी, शर्तीचे अडथळे असून, ते पार करण्यासाठी लाभार्थीना प्रयत्न करावे लागत असून, त्यांची कसोटी लागत आहे.
केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्यघर वीज योजना फेब्रुवारी २०२४ पासून सुरू असून घरगुती ग्राहकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीज उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे. मात्र मालेगाव तालुक्यात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मालेगाव महावितरण मंडळांतर्गत कळवण, मालेगाव, मनमाड व सटाणा विभागांतून आतापर्यंत ४,७४४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
यापैकी मालेगाव ग्रामीण उप-विभागातून ७५१ अर्ज दाखल झाले. परंतु त्यातील केवळ १०८ लाभार्थ्यांच्या छतावर सौरऊर्जा उपकरणे बसविण्यात आली आहेत. सध्या ६४३ अर्ज प्रलंबित असून, यातील ३२२ अर्जाना संमती मिळाली आहे. येत्या काळात आणखी २२४ लाभार्थीना प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे.
मालेगाव महावितरण मंडळांतर्गत कळवण, मालेगाव, मनमाड व सटाणा विभागातील ४,७४४ अर्जापैकी १६९१ लाभार्थ्यांच्या छतावर सौरऊर्जा उपकरणे बसवण्यात आली आहेत. तसेच १७९५ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. तसेच उर्वरित १२५८ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या योजनेकडे पाठ फिरविण्याची अनेक कारणे समोर आली आहेत.
अनेक अडचणीग्राहकांना भरावा लागणारा हफ्ता भविष्यात शून्य होईल असा गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये कौलारू अथवा धाब्यांची घरे असल्यामुळे छतावर सौर पॅनल बसवण्यात अडचणी येतात. काही अर्जदारांकडे वीज थकबाकी असल्याने अर्ज बाद झाले आहेत. याशिवाय नागरिकांच्या मते हप्त्याची रक्कमही जास्त आहे. योजनेच्या सर्वेक्षणावेळी नियमांचे उल्लंघन, अपुरी कागदपत्रे व पडताळणीतील त्रुटी आहेत.