Join us

पीक विम्याला तीनदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:30 IST

Pik Vima Yojana : १ रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) बंद करून सुधारित पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली.

गोंदिया : शासनाने यंदापासून १ रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) बंद करून सुधारित पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याने शासनाने या योजनेला तीनदा मुदतवाढ दिली. पण, यानंतरही या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कर्जदार व विना कर्जदार अशा एकूण ५१ हजार १५६ शेतकऱ्यांनी २५ हजार ११८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला आहे.

शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद करून या वर्षीपासून सुधारित पीक विमा योजना लागू केली. तसेच पीक कर्जाची उचल करणान्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही योजना ऐच्छिक केली. त्यामुळे योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

तर मागील तीन-चार वर्षातील पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा अनुभव चांगला नाही. नुकसान होऊनसुद्धा विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

तीनदा मुदतवाढ देण्याची वेळसुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने या योजनेला जुलैमध्ये आणि त्यानंतर १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. पण, यानंतरही अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. पण, यानंतरही शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ७६ हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ५१ हजार १५६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यात ५,०५१ कर्जदार तर ४६,१०५ विगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :पीक विमाशेतीशेती क्षेत्रशेतकरी