Pik Vima Yojana : एकीकडे पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) बदल केला जाणार असून तत्पूर्वी याआधीच्या पीक विमा योजनेत बोगस पीक विमा आढळून आले आहेत. बोगस पीक विमा काढला असेल, तर पीक विम्याची शेतकऱ्याने भरलेली रक्कम शासनाकडे जमा होऊन जाईल. शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. तसेच, त्याचा विमा अर्ज (Pik Vima Application) बाद ठरवला जाईल.
हवामानावर आधारित फळ पीक विमा (fruit Crop Insurance) योजनेंतर्गत विमा काढलेल्या ७१ हजार शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग व विमा कंपनीकडून सुरू केली होती. २५ एप्रिलपर्यंत ही पडताळणी करण्याची मुदत होती. मात्र, ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्याची पडताळणी केलेली नसल्याने, हे शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कृषी आयुक्तांकडून या पडताळणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ६२ हजारांपर्यंत शेतकऱ्यांनी पडताळणी करून घेतली. तर, ८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ही पडताळणी केलेली नाही. जिल्ह्यात ७१ हजार शेतकऱ्यांनी ७६ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचा विमा काढला आहे.
मात्र, कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार यंदा ६० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्रावरच केळीची लागवड झाली आहे. त्यामुळे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही पीक विमा काढला गेल्याची शक्यता आहे. याबाबतच विभागाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन, पीक विमा धारक शेतकऱ्यांनी शेतात केळीची लागवड केली आहे की नाही? याबाबतची पडताळणी सुरू केली होती.
या कारणांमुळे होणार विमाधारकांवर कारवाई...
- जर शेतात केळीची लागवड झालेलीच नसेल तरी पीक विमा काढला असेल तर
- शेतात १ हेक्टरवर केळीची लागवड व विमा मात्र ४ हेक्टरचा काढला असेल, तरी कारवाई होईल.
- एका व्यक्तीच्या नावावर ४ हेक्टरपेक्षा अधिकचा विमा काढला, तर विम्याचा अर्ज बाद केला जाणार आहे.
२०२२-२३ मध्ये ७ हजार शेतकरी ठरले होते बाद...२०२२-२३ या वर्षात शेतात केळी नसताना पीक विमा काढल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पाहणी केली असता, २१ हजार शेतकऱ्यांनी शेतात केळी नसतानाही पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात अंतिम पडताळणी अंती २१ हजारांपैकी ७ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून बाद करून, नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आली नव्हती. यंदाही हीच शक्यता असून, त्या दृष्टीने कृषी विभागाकडून पडताळणी सुरू आहे.