Navin Pik Vima Yojana : नवीन पीक विमा योजनेत (Navin Pik Vima Yojana) पीक कापणी प्रयोगासंदर्भात काय सांगितले आहे. तर जर एखाद्या विमा क्षेत्र घटकात निर्धारित केलेल्या संख्येप्रमाणे पीक कापणी प्रयोग पिकाखालील क्षेत्राअभावी होऊ शकले नाही तर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
ज्या ठिकाणी पिकाखालील पुरेसे क्षेत्र नसल्यामुळे, प्रतिकूल हवामान परिस्थिती / पायाभुत सुविधा यांमुळे पुरेसे पीक कापणी (Pik Kapani Prayog) होऊ शकणार नाहीत अशा परिस्थितीत संबंधीत विमा क्षेत्र घटकासाठी सर्वप्रथम लगतच्या सर्वाधिक साधर्म्य असलेल्या विमा क्षेत्र घटकाचे सरासरी उत्पादन गृहित धरावे. तसे करणे शक्य नसल्यासच संबंधित विमा क्षेत्र घटकापेक्षा उच्च एककाचे उत्पादन गृहित धरावे.
मात्र सदर तरतूद केवळ अपवादात्मक परिस्थितीतच व किमान विमा क्षेत्र घंटकांसाठी वापरता येईल, पीक कापणी प्रयोग टाळण्यासाठी या तरतूदीचा वापर करता येणार नाही. नियोजन केल्यानुसार पुरेसे पीक कापणी प्रयोग सर्व अधिसूचित विमा क्षेत्र घटकांमध्ये घेतले जातील, याची काळजी जिल्हास्तरीय यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. उंबरठा उत्पादन हे विमा दावे निश्चितीपूर्वी प्रसिद्ध करण्यात येणार नाही.
विमा कंपन्यांना पीक कापणी प्रयोगांचे सह-साक्षीदार (Co-Observer) होण्याची पूर्ण संधी राज्य शासनाने /संबंधीत क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी देणे तसेच संबंधित छायाचित्रे आणि तक्ते यांची ईलेक्ट्रॉनिक / भौतिक प्रत तात्काळ उपलब्ध करुन देणे बंधनकारक आवश्यक राहील. पीक कापणी प्रयोग घेणारे क्षेत्रिय स्तरावरील कर्मचारी / अधिकारी यांचेशी समन्वय साधणे व त्यानुसार मनुष्यबळ गतीशील करण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे वेळापत्रक किमान ७ दिवस अगोदर पीक विमा कंपनीस कळवावे.
जिल्ह्यात होणाऱ्या पीक कापणी प्रयोगाचे संनियंत्रण, समन्वयासाठी व आवश्यक माहिती प्राप्त करणेसाठी पीक विमा कंपन्यांना त्यांच्या एका कुशल प्रतिनिधीची काढणी हंगामात किमान ३ महीने जिल्हास्तरावर नियुक्ती करणे बंधनकारक राहिल. या प्रतिनिधीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात आवश्यक जागा व सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन देऊन पीक कापणी प्रयोगांचे माहितीचे आदान-प्रदान सुकर होण्याची व्यवस्था करावी.
पुढील उदाहरण पाहुयात... तुरीची लागवड करताना तुरीच्या दोन ओळीतील अंतर १८० से.मी. पर्यन्त असल्यास त्यास सलग पीक समजून पीक कापणीमध्ये त्याचे उत्पादन नोंदवावे. तुरीच्या दोन ओळीतील पेरणी अंतर १८० से.मी. पेक्षा जास्त असल्यास ज्या प्रमाणात दोन ओळीतील अंतरात वाढ होते, त्या प्रमाणात तुरीचे उत्पादन कमी होत नाही. तूर पीक मोकळी जागा व्यापते.
त्यामुळे तुरीतील अंतरपीक नोंदवून तुरीच्या दोन ओळीतील अंतर काढून तुरीचे उत्पादन ठरविताना अडचण येते. तुरीच्या दोन ओळीतील अंतर १८० से.मी. पर्यन्त असल्यास त्यास तुरीचे सलग पीक समजून पीक कापणी करावी आणि उत्पादन निश्चित करावे, मात्र दोन ओळीतील अंतर १८० से.मी. पेक्षा जास्त असल्यास १८० से.मी. अंतराच्या प्रमाणात मिश्र पिकाचे शेकडा प्रमाण विचारात घेऊन उत्पादनाची परिगणना करावी.