Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pik Vima : भरले कोट्यवधी, पण विमा अजूनही नाही; लाखो शेतकरी प्रतीक्षेत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:57 IST

Pik Vima : लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कोट्यवधी रुपये भरले, मात्र ठरलेला कालावधी संपूनही विमा कंपनीकडून नुकसानभरपाईचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.(Pik Vima)

Pik Vima : खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला असला तरी अद्याप नुकसानभरपाईबाबतचा अंतिम अहवाल जाहीर न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.(Pik Vima)

ठरलेला कालावधी संपूनही विमा कंपनीकडून कोणत्या पिकाला किती मदत मिळणार याची माहिती न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pik Vima)

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ५१३ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. या विम्यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे २६५ कोटी रुपये प्रीमियम भरला आहे.(Pik Vima)

तर राज्य आणि केंद्र सरकारने मिळून १ हजार ३६५ कोटी रुपयांचा हिस्सा भरून मोठ्या प्रमाणावर पिकांचे संरक्षण करण्यात आले.

या माध्यमातून जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या आर्थिक मूल्याचे संरक्षण करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

कापूस, सोयाबीनसह विविध पिकांचा समावेश

यावर्षी पीक विमा योजनेत सर्वाधिक क्षेत्र कापूस पिकाचे आहे. त्यानंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांचा समावेश आहे.

विमा कंपनीने अंतिम अहवालानंतर उंबरठा उत्पादन आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसानभरपाई देण्याचे निकष निश्चित केले आहेत.

सर्व पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण करून त्याचे अहवाल विमा कंपनीकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाई जाहीर होण्याची अपेक्षा होती.

मात्र अद्याप कोणत्या पिकाला, कोणत्या मंडळात किती मदत मिळणार याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

नुकसान झाले, तरी मदतीचा पत्ता नाही

पूर्वी पीक नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत माहिती दिल्यास नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया होती. मात्र यावर्षी सुधारित नियम लागू करून अंतिम पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निकषांची अंमलबजावणी झाल्यानंतरही प्रत्यक्षात नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

आर्थिक संकटात विमा मदतीची अपेक्षा

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला ओढ दिली, तर नंतर काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक पिकांचे उत्पादन घटले.

या परिस्थितीत पीक विम्याची मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र विमा कंपनीकडून अंतिम निर्णय जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

कापूस खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी

भारतीय कापूस महामंडळाकडून हमीभावाने होणाऱ्या कापूस खरेदीची मुदत १५ मार्चला संपणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक असल्याने ही मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.

गुरुवारी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन कापूस खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी अशी मागणी केली.

शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमीभावाने खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी विवस्वान संदीपभाऊ धुर्वे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

पीक विम्याचा अहवाल रखडणे आणि कापूस खरेदीची मुदत संपत आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी चिंतेत सापडले आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : सीसीआयच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे कापूस शेतकरी अडचणीत; एमएसपीचा लाभच नाही?

अधिक वाचा : Vidarbha River Linking Project : 'वैनगंगा-नळगंगा' प्रकल्पात बदल; कामाला गती देण्यासाठी सरकारची नवी रणनीती

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती