Join us
Daily Top 2Weekly Top 5

Organic Farming : महागडी खते सोडून शेतकरी आता करतायत 'ही' शेती वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:07 IST

Organic Farming : शेतकरी आता रासायनिक शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान' अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात तब्बल ६ हजार ५०० शेतकऱ्यांनी २ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर विषमुक्त शेतीचा प्रयोग सुरू केला आहे.(Organic Farming)

हिंगोली : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालल्याने आता शेतकरी पर्यायी शेती पद्धतीकडे वळताना दिसत आहेत.(Organic Farming) 

पर्यावरणपूरक आणि विषमुक्त अन्न उत्पादनाच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान' अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात तब्बल ६ हजार ५०० शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला आहे. (Organic Farming)

जिल्ह्यात सुमारे २ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा पॅटर्न राबविण्यात येत असून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

२०२५-२६ या वर्षात जिल्ह्यात नैसर्गिक शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर विविध गावांमधील शेतकऱ्यांचे ५२ गट तयार करण्यात आले. 

या गटांमधील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीची माहिती देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता पारंपरिक आणि शाश्वत शेतीकडे वळताना दिसत आहेत.

काय आहे नैसर्गिक शेती?

नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. ही शेती पूर्णपणे देशी गायीचे शेण, गोमूत्र, जीवामृत, बीजामृत आणि स्थानिक नैसर्गिक घटकांवर आधारित असते.

या पद्धतीत जमिनीचे नैसर्गिक आरोग्य टिकवून ठेवण्यावर भर दिला जातो. तसेच शेती उत्पादन पूर्णपणे विषमुक्त राहिल्याने ग्राहकांनाही सुरक्षित अन्नधान्य उपलब्ध होते.

खर्चात बचत, जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत

नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. 

बाजारातील महागडी रासायनिक खते, औषधे आणि कीटकनाशके खरेदी करण्याची गरज राहत नाही.

याशिवाय जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, मित्रकिडींचे संवर्धन होते आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे शेती अधिक टिकाऊ बनण्यास मदत होत आहे. हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण रोखण्यासाठीही नैसर्गिक शेती महत्त्वाची ठरत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

तालुकानिहाय नैसर्गिक शेतीचे चित्र

हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीचा विस्तार झाला आहे.

हिंगोली – १,३७५ शेतकरी

कळमनुरी – १,३७५ शेतकरी

सेनगाव – १,२५० शेतकरी

औंढा नागनाथ – १,२५० शेतकरी

वसमत – १,२५० शेतकरी

या सर्व तालुक्यांमध्ये शेतकरी गटांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना दिली जात आहे.

यंदा उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

'आत्मा'अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानासाठी यंदा अद्याप जिल्ह्याला कोणतेही उद्दिष्ट प्राप्त झालेले नाही. त्यामुळे २०२६-२७ मध्ये हे अभियान पूर्वीप्रमाणे राबविले जाणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जिल्ह्यात या अभियानाची जनजागृती अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. 

प्रचार आणि मार्गदर्शन कमी असल्याने काही भागांत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचेही समोर आले आहे.

शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल

रासायनिक शेतीमुळे वाढणारे खर्च आणि जमिनीची घटणारी सुपीकता लक्षात घेता नैसर्गिक शेती हा भविष्यासाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. 

विषमुक्त अन्नधान्य, कमी उत्पादन खर्च आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबी साध्य करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे विश्वासाने पाहत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : सेंद्रिय शेतीचा सल्ला; पण महाराष्ट्रात खतांचा वापर विक्रमी पातळीवर!

अधिक वाचा : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers embrace organic farming, leaving behind expensive fertilizers.

Web Summary : Farmers in Hingoli district are increasingly adopting organic farming practices. Over 6,500 farmers are participating in the 'National Natural Farming Campaign'. This shift reduces costs, improves soil health, and promotes sustainable agriculture with chemical-free produce.
टॅग्स :शेती क्षेत्रसेंद्रिय शेतीशेतकरीशेती