Orange Orchard Protection : अमरावती जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तीव्र थंडीची लाट कायम असून किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने संत्रा पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Orange Orchard Protection)
या कमी तापमानामुळे संत्रा झाडांची पाने सुकणे, फळांना तडे जाणे तसेच फळे काळी पडण्याचा धोका वाढल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) येथील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तातडीने एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Orange Orchard Protection)
हवामानातील अचानक बदलाचा फळपिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. विशेषतः संत्रा, मोसंबी यांसारखी फळझाडे तापमानाबाबत अतिशय संवेदनशील असतात. सामान्य परिस्थितीत तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास फळझाडांची कार्यक्षमता कमी होते. (Orange Orchard Protection)
तापमान आणखी घटल्यास झाडांच्या पानांना थंडीची इजा होऊन ती वाळल्यासारखी दिसू लागतात. याचबरोबर फळांना भेगा पडणे, फळे काळी पडणे असे नुकसान दिसून येते.(Orange Orchard Protection)
'ब्लॅक हार्ट' रोगाचा धोका
अतिथंडीमुळे संत्रा झाडांमध्ये 'ब्लॅक हार्ट' या समस्येचा धोका वाढतो. यामध्ये झाडाच्या खोडाचा व फांद्यांचा मध्यभाग काळपट होतो, मात्र बाहेरील साल सुरुवातीला सुस्थितीत दिसते.
पुढील टप्प्यात झाडाच्या खोडाची जमिनीलगतची साल फाटते. अति थंडीमुळे वनस्पतींच्या पेशींमधील पाणी गोठते आणि त्यामुळे पेशी फुटून झाडाची वाढ खुंटते. याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
वारा प्रतिबंधक लागवड उपयुक्त
थंडीपासून संरक्षणासाठी फळबागांच्या पश्चिम व दक्षिण दिशेला वारा प्रतिबंधक वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. यामध्ये मलबेरी, शेवगा, हादगा, पांगारा, शेवरी, बांबू यांसारख्या झाडांचा समावेश करता येतो. तसेच बागेच्या सभोवती चिलार, मेहंदी, करवंद यांसारख्या मध्यम उंचीच्या कुंपण झाडांची लागवड करावी. या झाडांची नियमित निगा आणि छाटणी करणे महत्त्वाचे असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
थंडीपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना
* थंडीची लाट येण्यापूर्वी आणि चालू असताना संत्रा झाडांच्या बुंध्याजवळ पालापाचोळ्याचे आच्छादन करणे अत्यंत आवश्यक आहे.
* झाडाच्या खोडाजवळ व आळ्यात तनस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस यांचा वापर करावा.
* रोपवाटिकेतील रोपे, कलमे व बियाण्यांचे वाफे यांवर तनस, गवत, तुराठ्याचे खोपटे किंवा छप्पर उभारून संरक्षण द्यावे.
* फळबागेत रात्रीच्या वेळी जागोजागी ओला पालापाचोळा पेटवून धूर केल्यास तापमानात थोडी वाढ होऊन थंडीचा परिणाम कमी होतो.
* पालाशयुक्त खते, वरखते, म्युरेट ऑफ पोटॅश किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून दिल्यास झाडांची पाणी व अन्नद्रव्ये शोषण करण्याची क्षमता वाढते आणि थंडीचा ताण सहन करण्यास मदत होते.
शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
सध्याची थंडीची लाट काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बागांची नियमित पाहणी करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे.
योग्य व्यवस्थापन केल्यास थंडीमुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : A cold wave is impacting orange orchards, causing damage to leaves and fruits. Agricultural scientists advise integrated management, including mulching, windbreaks, and potash fertilizers, to protect trees from the cold and prevent further losses.
Web Summary : शीत लहर से संतरे के बागों पर असर पड़ रहा है, जिससे पत्तियों और फलों को नुकसान हो रहा है। कृषि वैज्ञानिकों ने पेड़ों को ठंड से बचाने और आगे होने वाले नुकसान को रोकने के लिए मल्चिंग, विंडब्रेक और पोटाश उर्वरकों सहित एकीकृत प्रबंधन की सलाह दी है।