Join us

Nuksan Bharpai : फेब्रुवारी ते मे 2025 च्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:25 IST

Nuksan Bharpai : यंदा राज्यात विविध जिल्ह्यात फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट झाली.

Nuksan Bharpai :  यंदा राज्यात विविध जिल्ह्यात फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस (Avkali Paus) व गारपीट झाली. या काळात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे. 

फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत "अवकाळी पाऊस व गारपीट” यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मदतीस मान्यता देण्यात आली आहे. 

या शासन निर्णयानुसार DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती घेऊन, तपासून नियमानुसार कार्यवाही करावी.  चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. याची दक्षता घ्यावी. 

एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.

लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये. 

इथे वाचा संपूर्ण शासन निर्णय 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक विमापाऊस