Join us

Nashik Jilha Bank : नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक बदलले, संतोष बिडवई यांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 21:30 IST

Nashik Jilha Bank : शासकीय पातळीवर कर्ज वसुली संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण (PratapSingh Chavhan) हे नाराज होते.

नाशिक :  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य प्रशासकपदी (Nashik District bank) विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई (santosh Bidvai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शासकीय आदेश बुधवारी निघाले. शासकीय पातळीवर कर्ज वसुली संदर्भात घेतलेल्या दोन निर्णयामुळे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण (PratapSingh Chavhan) हे नाराज होते. याच नाराजी नाट्यातून त्यांनी राजीनामा दिला होता.

बारा दिवसानंतर चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांचे मन वळवण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले. चव्हाण यांनी सहकार आयुक्तांकडे २ मे रोजी राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा मंजूर करावा यासाठी विनंती देखील केली होती. त्यांच्या जागी बाळासाहेब देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्तीची चर्चा होती.

प्राप्त माहितीनुसार त्यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांनी प्रशासकपदी रुजू होण्यास सरकारला नापसंती कळविली होती. कारण जिल्हा बँकेत (Nashik Jilha Bank) कर्ज वसुलीचे धोरण हे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र संतोष बिडवई यांच्या गळ्यात ती माळ पडली. प्रशासक चव्हाण हे फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा बँकेत रुजू झाले होते. 

बिडवई यांचेसमोर अनेक आव्हाने              आता येणाऱ्या काळात नवनियुक्त प्रशासक संतोष बिडवई यांच्यासमोर जिल्हा बॅकेचे  2200 कोटीच्यावर थकीत कर्ज वसुल करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. बॅकेला आपली नवीन इमारत विक्री करण्याचा निर्णय घेण्याची नामूष्की आली आहे. मोठ्या कष्टातून उभी राहिलेली ही इमारत न विकता कर्ज कसे वसूल होईल? यासाठी त्यांना आराखडा आखावा लागेल. 

अशा काळात थकीत कर्जवसुली करण्यासाठी बँक प्रशासनाने कडक धोरण अवलंबवावे लागेल. प्रतापसिंग चव्हाण यांच्या कार्यकाळात २३५ कोटी रुपयांची कर्ज वसुली मागील वर्षभरात झाली होती. कर्ज वसुलीचे तेच धोरण पुढे अवलंबवावे लागेल. याशिवाय वसुली मोहीम राबविताना  जिल्ह्यातील मंत्र्यांची मर्जी सांभाळण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

बिडवई हे आता चौथे प्रशासक बँकेत 2021 पासून प्रशासक हेच कामकाज पाहत आहेत. सहकार उपनिबंधक महंमद अरीफ यांची पहिले प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर अरुण कदम हे प्रशासक झाले. प्रतापसिंग चव्हाण हे तिसरे प्रशासक होते. तर संतोष बिडवई हे आता बँकेचे चौथे प्रशासक असतील. प्रत्येक प्रशासकाच्या कारकिर्दीत कर्ज वसुली मोहीम राबवताना राजकीय हस्तक्षेप हे फार मोठे आव्हान प्रशासकासमोर उभे टाकले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकबँक