Join us
Daily Top 2Weekly Top 5

 राज्यातील 'हा' सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने केला सील, मालमत्ताही जप्त, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:35 IST

Sugar factory Sealed : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सील केल्याने व मालमत्ता जप्त केल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील एकमेव मोठा सहकारी प्रकल्प असलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सील केल्याने व मालमत्ता जप्त केल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्येही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत मंगळवारी जिल्हा बँक आणि तहसीलदार यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. 

नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे कर्ज रूपये १० कोटी ५१ लाख न फेडल्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मंगळवारी कारखान्यावर जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली. नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी पोलिस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेऊन तो धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि धुळे बँकेकडे हस्तांतरित केला आहे. 

कारखाना चालविण्यास घेतलेल्या द्वारकाधीश साखर कारखान्याने बँकेमार्फत प्रस्तावित असलेल्या या कारवाईच्या विरोधात ऋण वसुली प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेऊन स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्राधिकरणाने हा स्थगिती अर्ज फेटाळून लावला.

या निर्णयानंतर महसूल प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशाचे पालन करत तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाच्या उपस्थितीत कारखान्याची सर्व स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. 

आदिवासी सहकारी साखर कारखाना हा आदिवासींचा उन्नतीसाठी स्वर्गीय माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांनी २६ वर्षापूर्वी सुरू केला होता. कारखाना हा सलग २४ वर्षे सुरळीत चालला, परंतु गेल्या दोन वर्षापासून कारखाना बंद असून अशातच बँकेने केलेल्या कारवाईने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कारखान्याच्या या मालमत्ता घेतल्या ताब्यातसाखर कारखाना मुख्य साईट (डोकारे), वाहनतळ, पेट्रोल पंप आणि ई.टी.पी. विभाग, परिसरातील मंदिर आणि शैक्षणिक कॅम्पस, शेतकी निवास आणि कर्मचारी वसाहत, नसिंग वृक्ष लागवडीसाठीची जमीन, प्रेसमड आणि राख साठवणूक जागेसह इतर विभागांचा समावेश आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीसाखर कारखानेऊस