Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : चंद्रपूरच्या सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्र कसे काम करते? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:04 IST

Agriculture News :

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) ७० टक्के जनता अजूनही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती-मातीच्या समृद्धीसाठी योगदान देणाऱ्या संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. सिंदेवाही येथील शासकीय कृषी विज्ञान केंद्र (Krushi Vidnyan Kendra) त्यापैकीच एक खरिपाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे विशेषज्ञ (कृषी विस्तार) डॉ. विजय सिडाम यांच्याशी साधलेला संवाद...

कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार कार्याचे स्वरूप कसे आहे ?चंद्रपूर जिल्ह्यासाठी एप्रिल २००४ पासून सिंदेवाही येथे कृषी विज्ञान केंद्र सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत या केंद्राचे काम चालते. शेतकऱ्यांच्या शेतात अनुनियोजन चाचणी प्रयोग घेणे, महिला शेतकरी, शेतकरी, ग्रामीण युवक, युवती व विस्तार कर्मचाऱ्यांना शेतीबाबत शास्त्रीय व तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते, हवामान, जमीन आदी घटकांशी निगडीत व कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची समूह प्रथम रेषीय प्रात्यक्षिके राबविली जातात. तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार करणे हे देखील केंद्राचे उद्दिष्ट आहे. 

पर्यावरण व पर्जन्यमान स्थितीनुसार उपक्रमांचे नियोजन ठरते काय ?- कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात १५ तालुके येतात. पर्जन्यमानाच्या वर्गवारीनुसार अधिक पर्जन्यमानाचे क्षेत्र (नागभीड, ब्रहापुरी, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी) व सर्वसाधारण पर्जन्यमानाचे क्षेत्र (चिमूर, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, जिवती, कोरपना व राजुरा तालुके) असे दोन पर्यावरणीय प्रमुख भाग पडतात. पिकांबाबत बहुविविधता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करून भरघोस उत्पादन कसे मिळवता येईल, यावर संशोधन व विस्तार कार्याचा फोकस असतो. 

प्रमुख पिकांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न किती?- जिल्ह्यात तृणधान्यातील धान हे मुख्य पीक आहे. १,६९,९३६ हेक्टर क्षेत्रात लागवड होते. सरासरी हेक्टरी उत्पन्न १६.३५ क्विंटल आहे. कापसाचे क्षेत्र १,८८,२७८ असून, उत्पन्न ३.१९ क्विंटल, सोयाबीन ७३०३९ हेक्टर तर सरासरी उत्पन्न १५.७३ विवंटल, तुरीचे क्षेत्र ३२६८१ हेक्टर व उत्पन्न १०.५२ क्विंटल आहे. रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र ३० हजार हेक्टरपर्यंत पोहोचले. काही प्रमाणात जवस लागवडही होते. शेतकरी उन्नत व्हावा, याच हेतूने कृषी विज्ञान केंद्राचे कार्य चालते.

कोणत्या पिकांची प्रात्यक्षिके होतात ?- पीक संग्रहालय बीजोत्पादनात धान पीक पी. के. व्ही, तिलक, पी. के. व्ही. एच. एम. टी. पी. के. व्ही.- खमंग, सिंदेवाही - १, पी. के. व्ही. गणेश, शामला वाण लावण्यात आले. फळबागेत आंब्याच्या दशेहरी, लंगडा व केशर, नागिन, बैगनपल्ली, चिकूच्या कालीपत्ती व काजूच्या वेंगुर्ला ७ या जातींची लागवड होते, करंज, सीताफळ, गुलमोहर, चिंचेची रोपवाटिका तयार झाली. भाजीपाला पोषणबाग केंद्रात कारली, काकडी, वाल, भेंडी लागवड होते. मोहरी एसीएन ९, जवस - एन. एल. २६०, लाखोळी रतन व उन्हाळी हंगामात तीळ एन. टी. ११ प्रात्यक्षिक लागवड होते. डेअरी व मत्स्य तलाव युनिट, अॅझोला, गांडूळखत, नाडेप, पी. के. व्ही. मिनी डाळ मिल व तूरसाठी चाळणी यंत्राचे प्रात्यक्षिक युनिट सुरू झाले. तुती रोपवाटिकाही आहे. 

शेतकऱ्यांपर्यंत कोणते नवीन वाण पोहोचवले?- सोयाबीनसाठी तांत्रिक पद्धतीने समूह प्रात्यक्षिक झाले. धानासाठी पी. के. व्ही. तिलक वाण, तुरीसाठी पी. के. व्ही. तारा, जवससाठी पी. के. व्ही. एन. एल. २६०, जॅकी ९२१८ हे हरभरा वाण, कांदा पिकाचे अकोला सफेद व टोमॅटोचे अर्कारक्षक इत्यादींसह विविध पिकांचे नवीन वाण पोहोचविले जात आहे. शेतकरी त्याचा लाभ घेऊन प्रगती करत आहेत. त्याचीच फलश्रुती म्हणून दिनेश शेंडे यांना राज्य शासनाचा 'वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार' व गुरुदास मसराम यांना 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :चंद्रपूरशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन