Join us
Daily Top 2Weekly Top 5

NAFED Soybean Kharedi : 'नाफेड'च्या खरेदी प्रक्रियेत सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:19 IST

NAFED Soybean Kharedi : यंदा अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असताना, शासकीय खरेदी यंत्रणा नाफेडकडून माल परत केला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नियमावलीत सूट देत सरसकट खरेदी करण्याची जोरदार मागणी होत आहे. (NAFED Soybean Kharedi)

NAFED Soybean Kharedi :  यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस तब्बल नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिल्याने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यासह परिसरातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. (NAFED Soybean Kharedi)

सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, शासकीय खरेदी यंत्रणा असलेल्या 'नाफेड'कडून सोयाबीन खरेदी करताना कडक नियमावली लावली जात असल्याने आधीच संकटात सापडलेला सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.(NAFED Soybean Kharedi)

अतिवृष्टीचा थेट फटका सोयाबीनला

सोयाबीन पीक तुलनेने जास्त पाणी सहन करणारे असले, तरी शेंगा धरल्यानंतर सलग अनेक दिवस पडलेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

अनेक शेतांमध्ये सोयाबीन काढणीच्या स्थितीतच उभे असताना पावसात भिजत राहिले. परिणामी, अनेक शेंगांमधून मोड बाहेर आले, दाणे काळपट झाले, तर काही ठिकाणी दाण्यांची प्रत पूर्णतः खालावली.

अनेक शेतकऱ्यांनी मजबुरीने सोयाबीन उपटून काढले. त्यामुळे मातीचा अंश दाण्यांमध्ये मिसळला गेला आणि सोयाबीनचा रंग अधिक काळा पडला. ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरची असून, नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेली आहे.

'नाफेड'कडून सोयाबीन परत; शेतकरी हैराण

अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन शेतकऱ्यांनी यापूर्वी कधीही नाफेडच्या खरेदी केंद्रावर आणले नव्हते. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असल्याने शासनाने विशेष सवलत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

नाफेडकडून मात्र नियमाच्या चौकटीत न बसणारे सोयाबीन 'निकृष्ट माल' म्हणून परत केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर तोच माल खासगी व्यापाऱ्यांना क्विंटलमागे केवळ २ हजार ८०० ते ३ हजार रुपये या मातीमोल दरात विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

यंदा खरेदी प्रक्रियेत बदल; अडचणी वाढल्या

दरवर्षी सोयाबीनची खरेदी खरेदी-विक्री संघामार्फत केली जाते. त्याच ठिकाणी चाळणी, तपासणी आणि वजनाची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, यावर्षी खरेदी-विक्री संघात घेतलेला माल वखार महामंडळात साठविण्यात येत असून, तेथे विविध ग्रेडरमार्फत सखोल परीक्षण केले जात आहे.

या प्रक्रियेत नियमाच्या बाहेर गेलेला माल नाफेडच्या ग्रेडरकडून थेट परत केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नाफेडची खरेदी नियमावली काय सांगते?

यंदाच्या सोयाबीन खरेदीसाठी नाफेडने खालील मर्यादा निश्चित केल्या आहेत –

काडीकचरा व बाह्यपदार्थ : २ टक्के

रंगहीन, अपरिपक्व, चिरलेले दाणे : ५ टक्के

क्षतिग्रस्त, कीड किंवा भुंगा लागलेले दाणे : ३ टक्के

मशीनने तुटलेले किंवा भेगा पडलेले दाणे : १५ टक्के

ओलावा : १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा

या निकषांपैकी कोणतीही अट पूर्ण न झाल्यास सोयाबीन नाफेडकडून परत केले जात आहे.

'हे नुकसान हेतुपुरस्सर नाही' – शेतकऱ्यांची भूमिका

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यावर्षी सोयाबीनची प्रत ही नैसर्गिक आपत्तीमुळे खालावली आहे. शेतकऱ्यांनी हेतुपुरस्सर सोयाबीन खराब केलेले नाही. त्यामुळे शासनाने विशेष बाब म्हणून याकडे पाहावे.

नियमावलीत तात्पुरती सूट देत अतिवृष्टीग्रस्त सोयाबीनची सरसकट खरेदी करावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

नुकसान कसे भरून निघणार?

अतिवृष्टीमुळे आधीच पीक हातचे गेले आहे. त्यातून जे थोडेफार सोयाबीन वाचले, ते विक्रीसाठी केंद्रावर नेले असता नाफेडकडून परत पाठवले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कसे भरून निघणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : हमीभावाचा दबाव! नाफेडमुळे सोयाबीन बाजारात दराचा खेळ सुरू वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : NAFED Soybean Procurement: Farmers in Distress Due to Strict Rules

Web Summary : Yavatmal farmers face hardship as excessive rain damaged soybean crops. NAFED's strict procurement rules reject much of the produce, forcing farmers to sell at low prices to private traders. Farmers demand relaxed standards due to the natural disaster, fearing financial ruin.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेती