Join us

Nachani Thalipith : रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे नाचणीचे थालीपीठ, अशी आहे रेसिपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:15 IST

Nachani Thalipith : नाचणीच्या पिठासोबत विविध प्रकारचा भाजीपाला यात वापरला जात असल्याने शरीराला आवश्यक पोषणतत्वे मिळतात. 

नाचणीच्या पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी नाचणीच्या पिठात कांदा, कोथिंबीर, गाजर, मसाले आणि थोडे बेसन मिसळून कणीक मळावी लागते. नंतर तव्यावर थापून तुपावर सोनेरी होईपर्यंत भाजावी. हा एक पौष्टिक नाश्ता आहे व तो दही, लोणचे किंवा चटणीसोबत खाल्ला जातो. 

विशेष म्हणजे सकाळच्या न्याहारीसाठी थालीपीठ हा चांगला पर्याय आहे. ग्रामीण भागात पूर्वी महिला गव्हाच्या पिठाचे थालीपीठ बनवित होत्या. मात्र आता थालीपीठमध्ये नावीन्यपूर्ण बदल झाला आहे. वेगवेगळ्या भाज्या, पीठ व इतर साहित्यांचा वापर करून चवदार व पौष्टिक थालीपीठ बनविता येते. शहरी भागातील अनेक महिला रविवारच्या दिवशी आवर्जून थालीपीठ बनवितात.

हे साहित्य आवश्यक

एक पाव नाचणीचे पीठ, शेगव्याच्या शेंगा, एक वाटी शेवग्याचा पाला, एक मोठा कांदा उभा चिरलेला, एक चमचा आले, लसूण, मिरचीची पेस्ट, एक चमचा मसाला. अर्धा चमचा हळद, एक चमचा धने-जिरे पावडर, एक चमचा तीळ, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, २ चमचे दही, २ पळी तेल, चवीप्रमाणे मीठ आदी साहित्य लागते.

पदार्थ बनविण्याची कृती

  • प्रथम शेगव्याच्या शेंगांचे तुकडे करून कुकरमध्ये घालावेत व त्यात थोडी हळद व मीठ घालून चांगले शिजवून घ्यावे.
  • कुकर उघडल्यानंतर त्यात थोडा पाला घालून मिक्स करावे व त्याचे सूप गाळून घ्यावे. 
  • तयार सुपात नाचणीचे पीठ, कांदा उभा चिरून शेगव्याचा थोडा पाला, कोथिंबीर, तीळ, मीठ, हळद, मसाला, धने-जिरे पावडर, दही व दोन चमचे तेल घालून चांगले एकजीव करावे.
  • एखादी प्लास्टिकची घेऊन त्याच्यावर थोडे तेल पिशवी लावावे. 
  • मळलेल्या पिठातील भाकरीएवढा गोळा घेऊन हाताला थोडे पाणी लावून तो थापून घ्यावा. 
  • त्याला मध्ये छिद्र करून दोन्ही बाजूंनी तव्यावर भाजून घ्यावा.

 

आरोग्यासाठी लाभदायी

  • नाचणीच्या पिठासोबत विविध प्रकारचा भाजीपाला यात वापरला जात असल्याने शरीराला आवश्यक पोषणतत्वे मिळतात. 
  • प्रथिने तसेच जीवनसत्वे मिळून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महिलांना सकाळच्या नाश्त्यासाठी पोषक असे पदार्थ बनविता येते. 
  • यातून भरणपोषण चांगले होते. पचनही होते आणि आरोग्याला लाभही मिळतो.
टॅग्स :नाचणीशेती क्षेत्रशेतीपाककृती