Join us
Daily Top 2Weekly Top 5

मल्चिंगवरील पिकांचा लागवड खर्च वाढला, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संचाच्या दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 13:40 IST

Agriculture News : आता सरीवर प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकून ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केली जाते.

नाशिक : उन्हाळी मिरची, टोमॅटो आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते; परंतु महागाईचा परिणाम आता शेती क्षेत्रावरही दिसून येत असून प्लॅस्टिकसह शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात मिरची, टोमॅटो आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकांकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. कारण मिरची व टोमॅटो पीक तोडणीसाठी झाले असता दिवसभर तोडणी करून रात्री मार्केटला विक्री करून पैसा उपलब्ध करून देणारे पीक म्हणून पाहिले जाते. पूर्वी सरी पद्धतीने मिरची पिकाची लागवड केली जात असे; परंतु आता सरीवर प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकून ठिबक सिंचन पद्धतीने मिरची व टोमॅटो पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते.

आखाती देशाचे युद्ध सुरु झाल्यापासून उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी पीव्हीसी पाइप, मल्चिंग पेपर यांसारख्या साहित्यांच्या दरात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर ठिबक सिंचन संचाच्या किमतीत ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी थांबवल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. ठिबक सिंचन एकरी पाच ते सहा हजार रुपयांदरम्यान वाढ झाली आहे.

परिसरात सध्या मिरची लागवडीला सुरुवात झाली असली, तरी सुरुवातीलाच वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एक महिन्याअगोदरच सुमारे १३०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर आता थेट १८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच खतांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने लागवडीचा एकूण खर्च वाढला आहे.

दरांवर नियंत्रण आणावेलागवडीचा खर्च प्रचंड वाढला असून, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढा खर्च करूनही पुढे मिरचीला चांगला बाजारभाव मिळेल की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे शेती करणे आता जुगारासारखे झाले आहे. दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जात असून शासनाने हस्तक्षेप करून शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे प्लस्टिक व इतर कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन साहित्य महाग झाले असून, शेतकऱ्यांवर खर्चाचा मोठा बोजा पडत आहे. \

English
हिंदी सारांश
Web Title : Mulching Farming Costs Surge: Paper, Drip Irrigation Prices Rise

Web Summary : Rising plastic and raw material costs significantly increase mulching farming expenses. Mulching paper, drip irrigation equipment prices have surged, impacting farmers' profitability, demanding government intervention to control rates.
टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनखरीपशेती