Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Farming : खडकाळ शेतजमिनीत फुलली आंब्याची बाग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:42 IST

Mango Farming : पूर्णपणे खडकाळ आणि नापिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीतही शेती यशस्वी होऊ शकते का? सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील एका जिद्दी शेतकऱ्याने हा प्रश्न प्रत्यक्ष कृतीतून सोडवला आहे. (Mango Farming)

किशोर कळवत्रे

पूर्णपणे खडकाळ, पडीक व नापिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीतही मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यशस्वी शेती करता येते, हे सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील शेतकरी अशोक नवलसिंग सूर्यवंशी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Mango Farming)

त्यांनी खडकाळ जमिनीत केशर आंब्याची बाग फुलवून आज उत्पादनाचे चांगले व शाश्वत साधन निर्माण केले असून त्यांच्या या प्रयोगाकडे जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.(Mango Farming)

सराटी येथील गट क्रमांक ११ मधील सूर्यवंशी यांची जमीन पूर्णतः खडकाळ व नापिक स्वरूपाची होती.(Mango Farming)

या जमिनीत कोणतेही पारंपरिक पीक येत नसल्याने ती अनेक वर्षे पडीक अवस्थेत होती. मात्र, या जमिनीचा उपयोग करून घेण्याचा निर्धार करत अशोक सूर्यवंशी यांनी कमी खर्चात व जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा अभ्यास सुरू केला. विविध पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आंबा पिकाची निवड केली.(Mango Farming)

गटशेती प्रणेते व आंबा बागतज्ज्ञ डॉ. एम. बी. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांपूर्वी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धती व नियोजनबद्ध शेतीचा अवलंब १ एकर क्षेत्रात तब्बल ६६६ केशर आंब्याची रोपे लागवड केली. पहिल्या वर्षी यासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आला.(Mango Farming)

सर्व आंबा झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाण्याच्या उपलब्धतेसाठी सूर्यवंशी यांनी स्वतःच्या शेतात शेततळे तयार केले आहे.

सातत्यपूर्ण निगा, योग्य खत व्यवस्थापन व कीड-रोग नियंत्रणामुळे आंबा बाग बहरत गेली.

सहाव्या वर्षी म्हणजेच मागील हंगामात या बागेतून तब्बल ११ टन केशर आंब्याचे उत्पादन मिळाले. त्यामुळे सूर्यवंशी यांना चांगला आर्थिक लाभ झाला आहे.

येत्या वर्षांत उत्पादनात आणखी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या यशस्वी प्रयोगाची माहिती मिळताच जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी सराटी येथे भेट देऊन आंबा बागेची पाहणी करत आहेत व या प्रयोगाबाबत माहिती घेत आहेत.

खडकाळ व पडीक जमिनीत शेती करण्यासाठी सूर्यवंशी यांचा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान, सराटी शिवारात खडकाळ जमिनीत यशस्वी आंबा बाग फुलवून नावलौकिक मिळवलेल्या अशोक सूर्यवंशी यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने १७ जानेवारी रोजी शेतकरी मेळावा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास आंबा बागतज्ज्ञ डॉ. एम. बी. कापसे, जिल्हा कृषी अधीक्षक पी. आर. देशमुख, डॉ. एस. बी. पवार, कृषी महाविद्यालय दहेगाव (वैजापूर) येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. बनाडे, शास्त्रज्ञ डॉ. मुजफ्फर सय्यद, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड) यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक, गटशेती करणारे प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

या मेळाव्यास सराटी परिसरासह पिंपळदरी, मुखपाट, बाळापूर, बोदवड आदी गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. खडकाळ व पडीक जमिनीत फळबाग लागवडीच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

अशोक सूर्यवंशी यांचा हा यशस्वी प्रयोग खडकाळ जमिनीत शेती करण्याची नवी दिशा दाखवणारा ठरत असून इतर शेतकऱ्यांसाठी तो निश्चितच प्रेरणादायी आहे.

हे ही वाचा सविस्तर :AI Sugarcane Farming : ९ हजार भरा अन् ऊस उत्पादन वाढवा; 'एआय' शेतीचा फॉर्म्युला काय? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Success Story: Mango Farming Thrives in Barren Land

Web Summary : Ashok Suryavanshi transformed barren land into a successful mango farm using innovative techniques. With expert guidance, he cultivated Kesar mangoes, achieving high yields. His success inspires farmers to explore fruit farming in challenging terrains. A farmer workshop was also held.
टॅग्स :शेती क्षेत्रआंबाआंबाशेतकरीशेती