Join us

MahaBeej Seeds : महाबीज अकोला प्रयोगशाळेला राष्ट्रीय NABL मानांकन; बियाण्यांच्या गुणवत्तेला नवा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:31 IST

MahaBeej Seeds : शेतकऱ्यांच्या शेतीची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी बियाण्यांची गुणवत्ता सर्वात महत्वाची. याच गुणवत्तेची खात्री देणाऱ्या महाबीज अकोला प्रयोगशाळेला राष्ट्रीय पातळीवरील NABL मानांकन मिळालं आहे. (MahaBeej Seeds)

MahaBeej Seeds  : शेतकऱ्यांच्या शेतीची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी बियाण्यांची गुणवत्ता सर्वात महत्वाची. याच गुणवत्तेची खात्री देणाऱ्या महाबीज अकोला प्रयोगशाळेला राष्ट्रीय पातळीवरील NABL मानांकन मिळालं आहे. (MahaBeej Seeds)

हे मानांकन मिळवणारी महाबीज ही राज्यातील सार्वजनिक उपक्रमांमधील पहिलीच प्रयोगशाळा ठरली आहे. यामुळे बियाण्यांच्या चाचण्या व प्रमाणीकरणात अधिक पारदर्शकता, विश्वासार्हता आणि शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होणार आहे. (MahaBeej Seeds)

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवठा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) अकोला येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेला राष्ट्रीय पातळीवरील मान्यता प्राप्त झाली आहे.  (MahaBeej Seeds)

राष्ट्रीय मान्यता मंडळ (NABL) कडून चाचणी व अंशांकन प्रयोगशाळांसाठी हे मानांकन देण्यात आले असून, महाबीजची ही प्रयोगशाळा असे मानांकन मिळवणारी राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील पहिली बीजपरीक्षण प्रयोगशाळा ठरली आहे.(MahaBeej Seeds)

अकोला प्रयोगशाळेचा गौरव

महाबीजच्या अकोला, परभणी व जालना येथील तीनही बीजपरीक्षण प्रयोगशाळा बियाणे कायदा १९६६ अंतर्गत आधीच अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. 

आता अकोला येथील प्रयोगशाळेला NABL मानांकन मिळाल्याने या प्रयोगशाळेच्या कामकाजावर राष्ट्रीय पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

अत्याधुनिक चाचण्या आणि कुशल मनुष्यबळ

अकोला येथील महाबीज प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, येथे कुशल व अनुभवी तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. 

बियाण्यांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी येथे विविध अत्याधुनिक चाचण्या केल्या जातात.

* आर्द्रता चाचणी

* भौतिक शुद्धता चाचणी

* उगवण क्षमता मोजणी

* एलिझा चाचणी

* डीएनए फिंगरप्रिंटिंग

यांसारख्या चाचण्यांचा समावेश आहे.

या सर्व प्रक्रिया भारतीय किमान बीज प्रमाणीकरण मानकांचे काटेकोर पालन करून राबविल्या जातात.

शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह सेवा

महाबीजकडून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे दर्जेदार व प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. अकोला प्रयोगशाळेला मिळालेल्या NABL मानांकनामुळे शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह सेवा पुरविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाची गोष्ट

महाबीज अकोला प्रयोगशाळेला NABL मानांकन मिळालं.

राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील पहिली NABL मान्यताप्राप्त बीजपरीक्षण प्रयोगशाळा.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळासह दर्जेदार चाचण्या.

शेतकऱ्यांना खात्रीशीर व प्रमाणित बियाण्यांची हमी.

हे ही वाचा सविस्तर : Spraying Protection : फवारणी करताना छोटी चूक, मोठं नुकसान करेल; वाचा सुरक्षिततेचे उपाय

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीअकोलापरभणीजालना