Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lakhpati Didi Scheme : 'लखपती दीदींना' बँकांचे पाठबळ; अमरावतीत महिला स्वावलंबनाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:39 IST

Lakhpati Didi Scheme : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'लखपतीदीदी' योजनेला अमरावती जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार व लघुउद्योगांना चालना मिळत असून, बँकांच्या आर्थिक पाठबळामुळे हजारो महिला आज स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत.

Lakhpati Didi Scheme : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या 'लखपतीदीदी' योजनेला अमरावती जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ९९६ महिलांनी लखपतीदीदी म्हणून नोंदणी केली असून, शासनाने दिलेल्या ८० हजार ६१० महिलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने जिल्हा वेगाने वाटचाल करीत आहे.

महिला स्वावलंबनाला गती

'लखपतीदीदी' योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार, लघुउद्योग, गृहउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे.

या व्यवसायांना आर्थिक आधार मिळावा यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत असून, त्याचा थेट फायदा महिलांच्या उत्पन्नवाढीस होत आहे.

बँक लिंकेजमुळे उद्योगांना बळ

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत महिला बचतगटांना कोट्यवधी रुपयांचे बँक लिंकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आर्थिक पाठबळाच्या जोरावर अनेक महिलांनी स्वतःचे उद्योग सुरू केले असून, काहींनी आपले व्यवसाय विस्तारले आहेत. परिणामी महिलांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, अनेक महिला आता एक लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवू लागल्या आहेत.

काय आहे 'लखपतीदीदी' योजना?

'लखपतीदीदी' योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना उद्योजकतेकडे वळवणे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपेक्षा जास्त करणे हा आहे.

यासाठी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, आर्थिक साक्षरतेचे धडे, कमी व्याजदरात कर्ज, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिलं जातं. स्वयंसहायता गटांमधील महिलांना उद्योजक बनवून सामाजिक व आर्थिक समावेशन साधण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे

* आर्थिक सक्षमीकरण : महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन उत्पन्नात वाढ करणे.

* उद्योजकता विकास : महिलांना नोकरी शोधणाऱ्या नव्हे तर नोकरी देणाऱ्या बनवणे.

* कौशल्य विकास : विविध व्यवसायांसाठी आवश्यक प्रशिक्षण देणे.

* आर्थिक साक्षरता : बचत, गुंतवणूक आणि पैशांचे व्यवस्थापन शिकवणे.

* कर्ज उपलब्धता : व्यवसाय सुरू किंवा विस्तारासाठी कमी व्याजदरात कर्ज देणे.

* शाश्वत उपजीविका : टिकाऊ व दीर्घकालीन व्यवसाय पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

'लखपतीदीदी' योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढत असून, त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबासह संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. अमरावती जिल्हा पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी ठरत असून, लवकरच ८० हजारांहून अधिक महिला लखपतीदीदी बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा सविस्तर :Women Farmer Success Story : शेती म्हणजे नोकरीच; समृद्धीची वाट दाखवणारी आशाताईंची यशकथा वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Lakhpati Didi Scheme: Bank Support Empowers Women in Amravati District

Web Summary : Amravati's Lakhpati Didi scheme empowers rural women financially. Over 75,000 women registered, nearing the 80,610 target. Bank loans fuel self-employment in diverse sectors, boosting incomes and driving rural economic growth. The scheme aims to make women entrepreneurs with annual incomes exceeding ₹1 lakh through skill development and financial literacy.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिलाकेंद्र सरकारसरकारी योजना