Join us

राज्यात आतापर्यंत 56 लाख हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या, पहा पीकनिहाय पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:31 IST

Agriculture News : जिल्ह्यांमध्ये (Monsoon Rain) हजेरी लावल्याने पूर्व विदर्भवगळता अन्य विभागांमध्ये खरीप पेरणीला वेग आला आहे.

पुणे : मान्सूनने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये (Monsoon Rain) हजेरी लावल्याने पूर्व विदर्भवगळता अन्य विभागांमध्ये खरीपपेरणीला वेग आला आहे. राज्यात आतापर्यंत ५६ लाखांहून अधिक हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली असून सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण ३९ टक्के इतके आहे.

सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनची (Soyabean perani) ४५ टक्के अर्थात २१ लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. तर १८ लाख हेक्टर अर्थात सरासरीच्या ४३ टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, पूर्व विदर्भात अजूनही पुरेसा पाऊस न झाल्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत भाताची लागवड जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पेरण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. नागपूर विभागात आत्तापर्यंत २ लाख ८५ हजार २२ हेक्टर अर्थात एकूण सरासरी क्षेत्राच्या १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. 

राज्यात सर्वाधिक पेरण्या लातूर विभागात १६ लाख ३३ हजार ७०० हेक्टरवर अर्थात एकूण सरासरी क्षेत्राच्या ५८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. त्या खालोखाल अमरावती विभागात १३ लाख १७ हजार ७७० (४२ टक्के), संभाजीनगर विभागात ७ लाख ८४ हजार ५५२ हेक्टर (३७टक्के) तर पुणे विभागात ६ लाख ३४ हजार ७०५ हेक्टरवर (५१ टक्के) पेरण्या पूर्ण झाले आहेत. सर्वात कमी २० हजार ७११ हेक्टरवर (५ टक्के) पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत.

सोयाबीनची पेरणी २१ लाख हेक्टरवरपीकनिहाय क्षेत्राचा विचार केल्यास सोयाबीन पिकाची २१ लाख ८१ हजार ७०८ हेक्टरवर (सरासरी क्षेत्राच्या ४६ टक्के) पेरणी झाली आहे. कापूस पिकाची १८ लाख २९ हजार ३३८ हेक्टर (४३) टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. तर भाताची ८७ हजार ८७६ हेक्टर (६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तर ४ लाख ६७ हजार १४३ हेक्टरवर तूर पिकाची, १ लाख २६ हजार ६५३ हेक्टरवर बाजरी पिकाची, १ लाख ८६ हजार ४०५ हेक्टरवर उडीद पिकाची व १ लाख ५ हजार १२९ हेक्टरवर पेरणी झाली.

टॅग्स :खरीपपेरणीलागवड, मशागतशेती क्षेत्र