Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतात रांत्रदिवस पहारा द्यायची गरज नाही, मानव-वन्यजीव संघर्षावर काटेरी करडईचा उतारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:35 IST

Kardai Farming : शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तोडगा शोधून काढला आहे.

- प्रकाश पाटील चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत मानव-वन्यजीव संघर्षाने टोक गाठले असताना, मासळ परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तोडगा शोधून काढला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत यंदा शेतकऱ्यांनी काटेरी करडई तेलबियांच्या पिकाची लागवड केली. सुमारे २०० एकर क्षेत्रावर करडईचे पीक फुलले. वन्यप्राण्यांपासून होणारे पिकांचे नुकसानही टळले आहे.

वन्यप्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, हरीण व रानकुत्र्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके उद्ध्वस्त होणे, रात्रंदिवस पहारा देण्याची वेळ येणे आणि जीवितहानीचा धोका या साऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, यावर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या यशस्वी मार्गदर्शनातून करडईचा पर्याय शोधून काढला. 

काटेरी, कमी खर्चिक, कमी पाण्यावर येणारे व वन्यप्राण्यांना फारसे आकर्षित न करणारे हे पीक व्रत असल्याने प्रमाणात करडईकडे वळला आहे. हरभरा, उडीद, मूग, जवस यांसारख्या पारंपरिक कडधान्यांऐवजी आता करडई शेतीत आघाडीवर आहे. ताडोबा बफर व कोअर झोनला लागून असलेल्या मासळ परिसरात वन्यजीवांचा हैदोस असतो.

आवाहनाला मिळाला प्रतिसादमासळ परिसरात धान हे मुख्य पीक घेतले जाते. कापणीनंतर जमीन पडीक न ठेवता रब्बी हंगामात कमी ओलाव्यावर येणाऱ्या तसेच जंगली जनावरांमुळे नुकसान न होणाऱ्या करडई पिकाची लागवड करा, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मासळ परिसरातील करडईची लागवड केली. उपकृषी अधिकारी रूपेश सोनवणे सहाय्यक कृषी अधिकारी बळीराम येवले हे वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.

वन्यप्राण्यांपासून नुकसान टळलेमासळ, सातारा, कोलारा हा परिसर ताडोबा अभयारण्याचा जवळ असल्यामुळे वन्य प्राण्यांच्या नुकसानापासून संरक्षण मिळणाऱ्या पिकाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. मासळ व परिसरातील शेतकऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. पूर्वी रब्बी हंगामात शेतकरी केवळ हरभरा किंवा लाखोळी व कमी प्रमाणात गहू पीक घेतात. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करडईची लागवड केली.

धान कापणीनंतर शेत रिकामे राहण्यापेक्षा कृषी विभागाच्या सल्ल्याने करडई लागवड केली. या पिकाला खर्च कमी असून काट्यांमुळे वन्य प्राण्यांचा (उदा. रानडुकर) त्रासही कमी होतो. - अमित गंधारे, शेतकरी

मासळ परिसरातील दोनशे एकर क्षेत्रात करडईची लागवड झाली. काही दिवसात फुलोरा अवस्थेत येईल. वन्यप्राण्यांपासून धोका नाही. शेतकऱ्यांनी अळींपासून पिकाचे संरक्षण करावे. - रूपेश सोनवणे, कृषी अधिकारी

 

 यंदाच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी 'या' मोठ्या घोषणा, कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनबिबट्या