गडचिरोली : आज नाही तर उद्या कापसाचे दर (Kapus Bajarbhav) वाढतील, या आशेपोटी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून घरात कापूस दाबून ठेवलेला आहे. एकीकडे भाव वाढण्याऐवजी दर घटत चालला आहे. कापसाचा बाजारभाव तर घटलाच, पण पत्र्याच्या घरात चटका बसल्याने कापसाच्या वजनातही घट होत आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेतील कापसाचे वजनही घटल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.
कपाशीला भाव (Cotton Market) नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. परिणामी खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर भर दिला आहे. मात्र ज्यांनी पत्र्याच्या घरात कापूस ठेवला आहे. त्या शेतकऱ्यांना त्याचा जबर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कारण, ज्याच्या घरात उन्हामुळे उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे कापसाचे वजन प्रतिक्विंटल पाच ते दहा टक्के घटते, असे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्लबच्या घरात कापूस राहतो थंडज्याच्या घराच्या तुलनेत स्लॅब आणि माळवदाच्या घरात ठेवलेला कापूस थंड राहतो. अशा घरातील कापसाचे वजन पत्र्याच्या घरातील कापसाव्या तुलनेत घटत नाही. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात माळवदाचे घरे नाहीत. स्लॅब व कवेलूची घरे आहेत. उन्हाचा चटका वाढताच वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण घटते. याचा परिणाम कापसाच्या वजनात घट होण्यावर होतो. जेवढे जास्त तापमान तेवढा कापसाचे वजन कमी होते. त्यामुळे कापूस सुरक्षित घरात ठेवणे आवश्यक आहे.
खराब कापसाचे तर नावच काढू नका!गतवर्षीपासून कापसाचे दर ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरात आहेत. चांगला कापूस मातीमोल दराने विक्री होत असताना खराब कापसाच्या दराचे मात्र नाव काढू नका. खराब कापसाला तर साडेतीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच खरेदी करण्यात येते. चांगल्या दर्जाच्या कापसाला बऱ्यांपैकी भाव मिळतो. थानाचेही असेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या मालामध्ये दर्जा असणे आवश्यक आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाला मोठी मागणी आहे. असा कापूस थेट जिनिंगमध्ये ठोक स्वरूपात जात असतो.
गतवर्षी कापसाचे दर वाढतील, या आशेपोटी कापूस बरेच दिवस सांभाळला होता. शेवटी पावसाळ्यात राहायला जागा अपुरी पडत असल्याने कमी दराने कापूस विकावा लागला होता. कडक उन्हाचा फटका घरातील कापसाला बसल्याचे दिसून आले. चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.- प्रभाकर अलबनकार, कापूस उत्पादक शेतकरी