Join us

Jwari Harvesting : ज्वारी कापणी, मळणीसाठी किती रुपये मजुरी दिली जातेय? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:35 IST

Jwari Harvesting :  रब्बी हंगामातील (Rabbi Season) ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांच्या कापणी, काढणी, चारा जमा करणे सुरू आहे.

Jwari Harvesting : रब्बी हंगामातील (Rabbi Season) ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांच्या कापणी, काढणी, चारा जमा करणे आदी कामांचा अखेरचा हंगाम धडाक्यात सुरू आहे. कुठे हार्वेस्टर मशीनने तर कुठे मळणी यंत्राद्धारे धान्य काढणीचे (Jwari Harvesting) काम सुरू आहे. कुठे मशीनवर चारा कुट्टीचे कामे वेगात होत आहेत. मळणी यंत्र मालक ज्वारी १०० रुपये पोते, मका ५० ते ६० रुपये पोते, बाजरी १०० रुपये ते १२५ रुपये असा भाव घेत आहेत.

यंदाचा रब्बी हंगाम चांगला असून धान्यासोबतच चाराही यंदा चांगलाच आकारला आहे. हंगामावर पावसाची टांगती तलवार असून शेती कामांना वेग आला आहे. यावर्षी रब्बी हंगाम चांगला असल्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांचे उत्पन्न चांगले निघत आहे. मार्केटला भाव चांगला मिळत आहे. यंदा ज्वारी २०००-२१०० रुपये, मका २१००-२२०० रुपये, बाजरी ३००० रुपये प्रति क्विंटल असा भाव असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तसेच यंदा पीक कापणीचे (Jwari Kapani) दरही गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहेत. यावर्षी ज्वारी कापणीसाठी एकरी ८ हजार रुपये व मका व बाजरी कापणीसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये असा दर शेतमजूर आकारत आहेत. गेल्यावर्षी हाच तर ४ हजार रूपयांपर्यंत होता. तर मागीलवर्षी धान्यासोबतच चाऱ्यालाही चांगला भाव मिळाला होता. पाण्याच्या मुबलकतेने पिकांसोबतच चाराही मुबलक असल्याने चाऱ्याला मागणी कमी आहे. कडब्याचे भाव ७०० रुपये तर ८०० रुपये हजार चाऱ्यांची पेंडी असा कमी भावात विक्री होत आहे.

पावसाचे वातावरण चिंतेचे 

दरम्यान राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. तीन महिने शेतात राबून शेवटच्या क्षणी हातातोंडाशी आलेला घास वाया जायला नको, यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. तसेच यावर्षी रब्बी हंगामाला सिंचन विहीर, गिरणा नदी, जामदा उजवा व डावा कालव्यांना मिळालेले पाण्याचे आवर्तन, यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफुल, मका, बाजरी, भुईमूग आदी पिके हिरवळीने बहरली आहे. सुरुवातीस गहू व हरभरा आदी पिकांची काढणी झाली आहे. नंतर ज्वारी, मका या पिकांची कापणी होत आहे.

टॅग्स :ज्वारीशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड