Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jamin Mojani : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' गावांत जमीन मोजणी सुरू; तुमचाही नंबर लागू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 09:27 IST

Jamin Mojani : जमिनीच्या नोंदीतील गोंधळामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर विभागातील १५ गावांमध्ये पोटहिस्सा मोजणीला सुरुवात झाली आहे. (Jamin Mojani)

नागपूर : शेतजमिनींचे अचूक नोंदीकरण, सात-बारा उतारे अद्ययावत करणे आणि प्रत्येक भूभागाला स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने महत्त्वाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे.(Jamin Mojani)

नागपूर विभागातील १५ गावांमध्ये या प्रकल्पाअंतर्गत पोटहिस्सा मोजणी आणि नकाशे अद्ययावतीकरणाचे काम सुरू झाले आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.(Jamin Mojani)

राज्यातील सहा विभागांतील १८ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, नागपूर विभागातील नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील कुही, तुमसर आणि बल्लारपूर या तीन तालुक्यांतील प्रत्येकी पाच गावे निवडण्यात आली आहेत.

पोटहिस्सा मोजणी म्हणजे काय?

एकाच सर्व्हे नंबर किंवा गट नंबरमध्ये अनेक वारसांमध्ये किंवा कुटुंबामध्ये जमीन विभागली गेली असते. मात्र, प्रत्यक्ष नकाशात आणि सात-बाऱ्यात ही विभागणी स्पष्टपणे नोंदलेली नसते.

अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या वाट्याचा हिस्सा मोजून स्वतंत्रपणे नोंदवणे म्हणजे पोटहिस्सा मोजणी होय.

शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अनेक थेट लाभ मिळणार आहेत.

अचूक सात-बारा उतारा : जमीनधारकांची माहिती स्पष्ट आणि अद्ययावत होईल.

जमीन वाद कमी : सीमारेषा निश्चित झाल्यामुळे वाद टळतील.

कर्ज व विमा सुलभ : पीक कर्ज, विमा आणि नुकसानभरपाईसाठी अडचणी कमी.

सरकारी योजनांचा लाभ : कृषी योजना, अनुदान यासाठी अचूक नोंदी उपलब्ध.

भू-आधार क्रमांक : प्रत्येक भूभागाला स्वतंत्र ओळख मिळणार.

का आहे हा प्रकल्प महत्त्वाचा?

सध्या अनेक ठिकाणी नकाशे आणि अधिकार अभिलेख अद्ययावत नसल्यामुळे शेतकऱ्यांना योजना मिळण्यात अडथळे येतात.

पीक सर्वेक्षणातही अचूकता राहत नाही. त्यामुळे जमीनधारकांचे हक्क स्पष्ट करण्यासाठी आणि प्रशासनिक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत आहे.

मोजणीसाठी किती शुल्क?

एकत्र कुटुंबातील जमिनींच्या पोटहिस्स्यांची मोजणी करण्यासाठी शासनाने प्रति पोटहिस्सा २०० रुपये शुल्क निश्चित केले आहे. ही प्रक्रिया अधिकृतपणे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत केली जाणार आहे.

जनजागृतीसाठी 'समाधान शिबिरे'

गावागावांत 'समाधान शिबिरे' घेऊन शेतकऱ्यांना पोटहिस्सा मोजणीची माहिती दिली जात आहे. या शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मोजणीचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले जाते.

पुढे काय?

हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यभर पोटहिस्सा मोजणी आणि नकाशे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना 

आपल्या गावात हा प्रकल्प सुरू असल्यास त्वरित भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधा आणि पोटहिस्सा मोजणी करून घ्या. यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील आणि शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Jamin Kharedi : जमीन खरेदीत एक चूक करेल मोठं नुकसान; जाणून घ्या कायदा काय सांगतो 

अधिक वाचा : Jamin Mojani : सरकारचा मोठा निर्णय; प्रलंबित मोजणीचा तिढा सुटणार वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Division: 15 Villages to Have Land Subdivision Measurement & Updated Maps

Web Summary : Nagpur division will update land records in 15 villages via subdivision measurement. This project aims to provide unique land identification and resolve issues in agricultural schemes by accurately mapping land parcels and updating records.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकार