Jamin Kharedi : शेतजमीन विकत घेताना आमची फसवणूक झाली जमिनीचा मूळ मालक वेगळाच होता, पण प्रत्यक्षात जमीन कसणारी व्यक्ती दुसरीच निघाली, जमीन वडिलोपार्जित होती, पण एकाच भावाने सर्व जमीन वडिलांच्या पश्चात स्वतच्या नावे करून अन्य भाऊ बहिणींना अंधारात ठेवून विक्री केली व त्यानंतर त्या भाऊ बहिणी यांनी झालेले खरेदीखत रद्द करून जमीन वाटणीचा दावा दिला, या व अशा अनेक तक्रारी वेळोवेळी कानावर येतात. त्यामुळे जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
सर्वात प्रथम जमिनीचा सातबारा (Satbara) आणि फेरफार उतारा काळजीपूर्वक बघणे गरजचे असते. कारण की याच कागदपत्र अन्वये आपल्याला ती जमीन पाहिल्या मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे कशी हस्तांतरित झाले हे कळते. ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा चालू सातबारा काढून घ्यावा.
किंवा आपल्याला डिजिटल सातबारा व फेरफार महाभूमी अभिलेखच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr ह्या वेबसाईट वरून सुद्धा काढता येतो. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे. सातबाऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचींच आहे का ते पाहावे. त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक, इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणं आवश्यक असतं.
जमिनीवर कोणत्याही बँक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसंच त्या जमिनीबाबत न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पाहावं. शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी जात नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालयातल्या अभिलेख कक्षात जमिनीच्या इतिहासाशी संबंधित ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. मित्रानो हस्तलिखित जुने किंवा चालू फेरफार उतारे पाहिल्यास सदर जमिनीच्या मालकी हक्कात वेळोवेळी कोणकोणती बदल होत गेले, याची माहिती कळते. तसेच शेत जमिनीचे मागील 30 वर्षापूर्वी पर्यंतचे सर्च रिपोर्ट काढून घ्यावे यामुळे शेत जमिनीची निगडित बहुतांश बाबी आपल्याला निदर्शनास येतील.
- ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडेकायदे विषयक अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन प्रमाणित (मो.नं. 9970013343)