Join us

Bamboo Cluster : गोंदिया जिल्ह्यात बांबूचे कोठार, मात्र प्रक्रिया उद्योग असणे महत्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 3:40 PM

गोंदिया जिल्ह्यातील बांबू प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील लाकूड आगारांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे बांबू नवेगावबांध येथील प्रकाश निष्कर्षण विभागात दाखल होतात. हजारो रुपयांचा बांबू लाकूड आगारात पडलेला असतो. त्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने तो पावसात खराब पण होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध असून सुद्धा गोंदिया जिल्ह्यात कुठेही बांबूचे क्लस्टर किंवा बांबूवर प्रक्रिया उद्योग नसल्याने मोठ्या प्रमाणात येथून बांबूचा लिलाव करून तो बाहेर ठिकाणी पाठविले जात असल्याचे चित्र आहे.

गोंदिया जिल्हा वनसंपत्तीने परिपूर्ण असलेला जिल्हा आहे. येथील जंगलातील तेंदूपत्ता आणि बांबू ही वनसंपदा जिल्हयातील ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. बांबू लिलावाच्या माध्यमातून शासन व वनविभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पण या ठिकाणी बांबूवर प्रक्रिया उद्योग राबविला, तर गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. मोठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त होईल. परंतु शासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारे या दिशेने काम केले नसल्याने बांबू असूनही हा परिसर बांबू क्लस्टरअभावी अपेक्षित आहे. परिणामी रोजगार मिळत नाही. येथील बांबू बऱ्याच लोकांना रोजगार देतो. बुरड लोकांना हा बांबू एक बांबू २८ रुपये दराने विकल्या जातो. 

नवेगावबांध येथून बांबूची मोठ्या प्रमाणात वनविभागाकडून विक्री केली जाते. या विक्रीतून शासनाला मोठा महसूल प्राप्त होतो. त्यानंतर उरलेल्या बांबूचे लाट लावून त्याचाही लिलाव केला जातो. एकूणच उपलब्ध असलेल्या बांबूसाठी प्रक्रिया उद्योग उभा केल्यास स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. आज बांबूचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. अनेक प्रदर्शनात बांबूंच्या वस्तूंचा बोलबाला पाहायला मिळतो. मात्र नवेगावबांध येथील लाकूड आगारात कोट्यवधीचे बांबू उपलब्ध असतांना क्लस्टर किंवा प्रकिया उद्योग नसल्याने रोजगार उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. 

तर मिळेल शेकडो हातांना रोजगार

नवेगावबांध परिसरात चांगल्या प्रतीचा बांबू तयार होतो. या बांबूला इतरत्र मोठी मागणी आहे. या बांबूवर जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. शिवाय परिसराचा सुद्धा विकास करने शक्य आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रबळ पाठपुराव्याची गरज आहे. पण दुर्दैवाने नेमका त्याच गोष्टींचा अभाव आहे.

टॅग्स :शेतीगोंदियाबांबू गार्डनशेती क्षेत्र