नितीन कांबळे
आजच्या काळात कोणी गाडी, बंगला किंवा महागड्या वस्तू दाखवून आपलं यश मिरवतं. पण आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने मात्र आपल्या यशामागील खरी नायिका 'गाय' असल्याचं दाखवत तिचा पुतळा बंगल्यावर उभारला आहे. (Inspiring Farmer Story)
गावात तर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, सोशल मीडियावरही ही बातमी व्हायरल होत आहे. गावाकडे नेहमीच प्राणी आणि माणसातील नातं घट्ट असतं.(Inspiring Farmer Story)
पण आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या आयुष्याला घडवणाऱ्या गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बंगल्याच्या छतावर तिचा हुबेहूब पुतळा उभारला आहे. ही केवळ एक घटना नाही, तर शेतकरी आणि गाईमधील नात्याचं भावनिक दर्शन आहे. (Inspiring Farmer Story)
दुग्ध व्यवसायाने बदललं नशिब
अंभोरा गावातील अंकुश हरिभाऊ ओव्हाळ यांनी १९९९ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यावेळी विकत घेतलेली पहिली गायच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. उत्तम दूध उत्पादनामुळे त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं.
याच गायीच्या आधारावर त्यांनी लाखमोलाचा आलिशान बंगला बांधला, मुलांना शिक्षण दिले आणि व्यवसाय वाढवत १५ हून अधिक गायींपर्यंत मजल मारली.
५० हजार खर्चून उभारला वास्तवदर्शी पुतळा
आपल्या पहिल्या गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी बंगल्याच्या छतावर सिमेंटपासून हुबेहूब पुतळा उभारला. या पुतळ्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांचा खर्च आला.
पुतळा इतका जिवंत वाटतो की दूरवरून पाहणाऱ्याला तो खरा गाय असल्याचा भास होतो.
गावकऱ्यांचा उत्साह, सोशल मीडियावर व्हायरल
गावातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हा पुतळा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेक जण फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे ओव्हाळ यांचा हा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
ओव्हाळ यांची ही कृती केवळ एका गायीचा पुतळा उभारण्यापुरती मर्यादित नसून, माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं व कृतज्ञतेचं प्रतीक आहे.
हा अनोखा उपक्रम पाहून अनेक तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे की, यशाचं मूळ कधीच विसरू नका!.
शेतकऱ्याची भावना
ही गाय माझ्यासाठी जनावर नाही, तर कुटुंबातील सदस्य आहे. तिने मला आयुष्यात उभं राहायला मदत केली. तिच्या उपकारांची परतफेड शक्य नाही. तिचा मी मरेपर्यंत सन्मान करेन.- अंकुश ओव्हाळ, शेतकरी