Join us

Illegal Fertilizer : जालन्यात परवाना नसलेल्या कंपनीकडून बेकायदेशीर खत साठा जप्त वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:41 IST

Illegal Fertilizer : जालना येथे रेल्वे रेक पॉइंटवर बेकायदेशीररीत्या खताचा साठा उतरत असल्याची माहिती मिळताच कृषी विभाग सतर्क झाला. तपासणीदरम्यान २० लाख रुपये किमतीचा, परवानगी नसलेला फॉस्फोजिप्सम पावडर खताचा ३२० मेट्रिक टन साठा आढळला. संबंधित कंपनी आणि जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. वाचा सविस्तर (Illegal Fertilizer)

Illegal Fertilizer : जालना जिल्ह्यातील कृषी विभागाच्या पथकाने रविवारी मोठी धडक कारवाई करत बिनपरवाना व अवैध खतसाठा जप्त केला आहे. कंपनीकडे खत उत्पादनाची कोणतीही वैध परवानगी नाही. (Illegal Fertilizer)

तब्बल ३२० मेट्रिक टन फॉस्फोजिप्सम पावडर खत उतरवले जात होते. या खताची अंदाजे किंमत २० लाख रुपये असून, यासंदर्भात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Illegal Fertilizer)

कारवाईची पार्श्वभूमी

जालना येथील रेल्वे रेक पॉइंटवर खत उतरवले जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानंतर जिल्हा परिषद कृषी विभागाचे खत निरीक्षक विशाल धर्मराज गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाहणीदरम्यान लक्षात आले की, कृष्णा पोस्केम लि., मेघानगर, जिल्हा जाबुआ (मध्य प्रदेश) या कंपनीचा खतसाठा रेल्वे रेक पॉइंटवर उतरवण्यात येत होता. सदर खत फॉस्फोजिप्सम पावडर प्रकारचे असून, कंपनीकडे त्या खताचे उत्पादन करण्यासाठी अधिकृत परवाना नव्हता.

पंचनामा करून जप्ती

अधिक चौकशीअंती समजले की, सदर खत जालन्यातील गुंडेवाडी शिवारातील एका भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनमध्ये साठवण्यात आले आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने तिथे जाऊन पंचनामा केला व गोडाऊनची पाहणी केली.

गोडाऊनमध्ये २० लाख रुपयांचा, तब्बल ३२० मेट्रिक टन साठा आढळून आला. संबंधित साठा त्वरित जप्त करण्यात आला.

नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

या कारवाईदरम्यान खताचे नमुने घेऊन ते छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीनंतर खताच्या गुणवत्तेवर अधिकृत अहवाल सादर होईल.

गुन्हा दाखल

या प्रकरणात खत निरीक्षक विशाल गायकवाड यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार कंपनी व इंद्रराजसिंग डांगी या परवान्यातील जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांचा कारवाईत होता सहभाग

तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) - आशिष काळुशे, मोहीम अधिकारी, जि.प. - नीलेश कुमार भदाणे, जिल्हा कृषी अधिकारी - विशाल गायकवाड यांच्यासह कृषी विभागातील कर्मचारी यांचा समावेश होता.

ही कारवाई म्हणजे बेकायदेशीर खत विक्रीविरुद्धचा एक ठोस पाऊल आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य व प्रमाणित खत उपलब्ध होणे आवश्यक आहे. कृषी विभागाने दाखवलेली तत्परता आणि दक्षता यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील, यात शंका नाही.

हे ही वाचा सविस्तर : HTBT Cotton Seed : शेतकऱ्यांनो सावध! प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्रीवर कृषी विभागाचा 'वॉच' सुरू वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रखतेजालनाशेतकरीशेती