HTBT Seeds : गुजरात आणि तेलंगणामधून येणाऱ्या प्रतिबंधित बीटी बियाण्यांनी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांची नावे वापरून थेट गावागावात हे बियाणे पोहचवले जात आहे. (HTBT Seeds)
अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केलेली नसल्याने, ही फसवणूक अधिक गती घेत आहे. प्रशासन कारवाई करत असले तरी, सजगता हीच शेतकऱ्यांसाठी सुरक्षा ठरणार आहे. (HTBT Seeds)
खरीप हंगामात कापसाच्या लागवडीला वेग आला असताना, शेतकऱ्यांना भासवून प्रतिबंधित बीटी बियाण्यांची विक्री सुरू आहे. हे बियाणे नामांकित कंपन्यांच्या नावाखाली, पण कोणतेही उत्पादन तपशील नसलेले, पॅकेटवर माहितीशिवाय विकले जात आहे. या प्रतिबंधित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या आर्थिक नुकसानीच्या सावटाखाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. (HTBT Seeds)
बोगस बियाण्याचं मोठं रॅकेट; २० दिवसांत ८ कारवाया!
अवघ्या २० दिवसांत भरारी पथकांनी ८ कारवाया करून १५ लाखांहून अधिक किंमतीचं बियाणं आणि खत जप्त केलं आहे.
या बियाण्यांचे पॅकिंग कुठे झाले, मालक कोण याचा पत्ता नाही.
यामध्ये नामांकित कंपन्यांची नावे वापरण्यात आली, पण कुठलीही बिले किंवा प्रमाणपत्र नाही.
फसवणूक अधिक प्रभावी करण्यासाठी गावातील बेरोजगार युवक, शेतकरी व इतरांना हाताशी धरले जात आहे.
वाहनांद्वारे गावागावात पोहचतेय फसवणूक
* प्रतिबंधित बियाण्यांची वाहतूक करण्यासाठी आलिशान चारचाकी, दुचाक्या व मालवाहू वाहनांचा वापर
* चेकपोस्ट चुकवून ही वाहने थेट गावात पोहोचत आहेत, यामुळे पोलिस प्रशासन आणि कृषी विभागाचे धाबे दणाणले आहेत
* गुजरात व तेलंगणातून मोठ्या प्रमाणावर हे बियाणे येत आहे
शेतकऱ्यांच्या माथी नुकसान… आणि भरपाईही नाही!
जिल्ह्यात यंदा ५ लाख हेक्टरवर कापूस लागवडीचं लक्ष्य आहे, मात्र ७५ टक्के क्षेत्रात अजून लागवड बाकी आहे.
याच काळात अनधिकृत विक्रेते HTBT आणि इतर प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्रीत आक्रमक झाले आहेत.
शेतकरी जर हे प्रतिबंधित बियाणे वापरले, आणि पिक खराब झालं, तर ना भरपाई, ना विमा होतो फक्त नुकसान.
प्रशासनाची खबरदारी आणि आवाहन
* पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार कारवाया सुरू आहेत
* कृषी विभाग आणि भरारी पथकाने गुप्त माहितीवरून धाडसी छापे टाकले
* शेतकऱ्यांनी फक्त परवाना असलेल्या दुकानातूनच बियाणे खरेदी करावे, बिल घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधित बियाण्याचं रॅकेट फक्त विक्रीपुरतं मर्यादित नसून, ते गावागावात पसरत आहे. शेतकऱ्यांची मेहनत आणि पैसा दोन्ही धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराला रोखण्यासाठी प्रशासन सक्रीय झालं असलं, तरी शेतकऱ्यांनी स्वतःही सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे.
हे ही वाचा सविस्तर : HTBT Cotton Seeds : एचटीबीटीवरून संघर्ष उफाळतोय; ठोस निर्णयाची गरज वाचा सविस्तर