Join us
Daily Top 2Weekly Top 5

HTBT Cotton Seeds : गुप्त मार्गाने 'एचटीबीटी'ची एंट्री; सिंडीकेटसमोर कृषी विभाग हतबल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:34 IST

HTBT Cotton Seeds : आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून गुप्तपणे 'एचटीबीटी' बियाण्यांची आवक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कायदेशीर बंदी असूनही या बियाण्यांची विक्री रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.(HTBT Cotton Seeds)

गजानन मोहोड

केंद्र सरकारकडून अद्याप मान्यता न मिळालेल्या बीजी-३ म्हणजेच 'एचटीबीटी' कपाशी बियाण्यांची अवैध विक्री राज्यात पुन्हा डोके वर काढत आहे.(HTBT Cotton Seeds)

गतवर्षी सर्वाधिक कारवाया अमरावती जिल्ह्यात झाल्या असतानाही यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर पुन्हा या प्रतिबंधित बियाण्यांचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. (HTBT Cotton Seeds)

आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर ही बियाणे गुप्त मार्गाने जिल्ह्यात आणली जात असल्याची माहिती आहे.(HTBT Cotton Seeds)

विशेष म्हणजे, मागील वर्षी कृषी विभागाने या प्रकरणात अनेक कारवाया करून पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, या संपूर्ण अवैध व्यापारामागील मुख्य 'सिंडीकेट' किंवा आंतरराज्यीय रॅकेटपर्यंत पोहोचण्यात यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे यंदाही या बियाण्यांची विक्री रोखणे हे कृषी विभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. (HTBT Cotton Seeds)

काय आहे 'एचटीबीटी'?

'एचटीबीटी' (Herbicide Tolerant Bt) हे जनुकीय बदल (GM) केलेले कपाशी बियाणे आहे. या वाणावर 'ग्लायफोसेट' या तणनाशकाचा परिणाम होत नाही. त्यामुळे शेतातील तण नष्ट होतात, मात्र पिक सुरक्षित राहते. यामुळे निंदणाचा खर्च आणि मजुरी वाचते.

शेतकऱ्यांचा वाढता कल

मजुरांची टंचाई आणि वाढता खर्च यामुळे अनेक शेतकरी 'एचटीबीटी' बियाण्यांकडे वळताना दिसत आहेत. कमी खर्चात तण नियंत्रण होत असल्याने अल्पकालीन फायदा दिसतो. मात्र, या बियाण्यांना अधिकृत मान्यता नसल्याने शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. फसवणूक झाल्यास नुकसान भरपाईची शक्यता अत्यल्प असते.

गंभीर धोके

'एचटीबीटी' बियाण्यांच्या वापरामुळे दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात.

पर्यावरणीय धोका : 'ग्लायफोसेट' तणनाशक आरोग्यास अपायकारक आणि कर्करोगजन्य असल्याची भीती व्यक्त केली जाते.

जमिनीची सुपीकता घटते : सूक्ष्मजीव नष्ट होऊन जमीन नापीक होण्याचा धोका.

सुपर वीड्सचा धोका : भविष्यात अशी तणे तयार होतात, ज्यावर कोणतेही औषध परिणाम करत नाही.

कायदेशीर गुन्हा : प्रतिबंधित बियाण्यांचा साठा किंवा विक्री करणे हा फौजदारी गुन्हा आहे.

कारवाईत घट?

पूर्वी तालुकास्तरावर कार्यरत असलेली गुणनियंत्रण भरारी पथके रद्द करण्यात आली आहेत. त्याऐवजी कृषी अधिकारी (गुणनियंत्रक) या पदावर अधिकार केंद्रीत करण्यात आले. यामुळे स्थानिक पातळीवरील अचानक तपासणी आणि कारवाई कमी झाल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

फक्त परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावीत आणि पक्की पावती घ्यावी. अनधिकृत बियाण्यांपासून दूर राहावे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.- राहुल सातपुते,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

प्रतिबंध असूनही 'एचटीबीटी' बियाण्यांचा वाढता वापर ही चिंतेची बाब ठरत आहे. अल्पकालीन फायद्याच्या मोहात शेतकरी अडकत असताना दीर्घकालीन पर्यावरणीय, कायदेशीर आणि आर्थिक धोके अधिक गंभीर आहेत. सिंडीकेटवर कारवाई करून या अवैध व्यापारावर आळा घालणे आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, हीच सध्या काळाची गरज आहे.

हे ही वाचा सविस्तर : HTBT Cotton Seeds : कापूस शेतकऱ्यांनो सावधान! HTBT बियाणे वापरले तर तुरुंगवास निश्चित?

अधिक वाचा : Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाचा मोठा प्लॅन; पण भूसंपादनाचा मोबदला अजूनही गूढ!

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal HTBT cotton seed sales challenge agriculture department in Amravati.

Web Summary : Amravati faces the challenge of curbing illegal HTBT cotton seed sales. Despite previous actions, a syndicate persists, exploiting loopholes across state borders. Farmers favor HTBT for cost savings, but risks include environmental damage, legal issues, and soil degradation, urging authorized purchases.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेती