Join us

Tomato Crop : पावसाळी टोमॅटोचे पुनर्लागवड व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:08 IST

Tomato Crop Management : टोमॅटो लागवडीसाठी शेतामध्ये सऱ्या पडून ठेवल्या असून यानंतर काय कराल? हे समजून घेऊया..

Tomato Cultivation : सध्या टोमॅटो लागवडीपूर्वीची (Tomato Cultivation) तयारी सुरु आहे. शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शेतामध्ये सऱ्या पडून ठेवल्या आहेत. त्यानंतर आता शेतामध्ये सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून घ्यावेत. टोमॅटोची रोपे (Tomato Seed) तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी.

पुनर्लागवडीपूर्वी रोपवाटिकेमध्ये साधारणतः एक आठवडा अगोदर पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी. म्हणजे रोपे कणखर होतात. लागवडीसाठी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज निघतात. पुनर्लागवडीसाठी २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सें.मी. उंच व साधारण ६ ते ८ पाने असलेली रोपे निवडावीत. लागवडीसाठी योग्य वाढीची सशक्त रोपे निवडावीत. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व पातळ खोड असणारी तसेच रोगट रोपे पुनर्लागवडीसाठी वापरु नयेत.

पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ४ मि.ली. अधिक मेटॅलॅक्झिल एम (३१.८ इएस) ६ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात १०-१५ मिनिटे बुडवून घ्यावीत. नर्सरीमधून आणलेल्या रोपांच्या ट्रेमध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी.)

दोन रोपांत साधारण ३० सें.मी. आणि सरीत ९० सें.मी. अंतर ठेवून टोमॅटो रोपांची लागवड करावी. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात. लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांनी मेलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावावीत.

टॅग्स :टोमॅटोलागवड, मशागतशेती क्षेत्रशेती