Join us

Honey Bee : मधमाशीपालन आणि उत्पादने, प्रक्रिया

By गोकुळ पवार | Updated: December 27, 2023 16:49 IST

मधमाशी पालनातून मध, मेण, परागकण, प्रोपोलिस आणि रॉयल जेली इत्यादी उत्पादने मिळतात.

मधमाशी ही आपल्या कुटुंबीयांसाठी झिजत असते. अन्नासाठी प्रवास करत मध तयार करत असते. याच मधापासून आज वेगवगेळी उत्पादने तयार केली जातात. आतापर्यत आपण मधमाशी पालन आणि त्याचे प्रकार आणि ते कसे केले जाते, याबाबत माहिती घेतली. यानंतर मधमाशी पालनातून कोणकोणती उत्पादने किंवा रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होऊ शकते? याबाबत जाणून घेणार आहोत. 

मधमाशी पालनातून मध, मेण, परागकण, प्रोपोलिस आणि रॉयल जेली इत्यादी उत्पादने मिळतात. यातील मध, प्रोपोलिस, रॉयल जेली या उत्पादनांना मोठी मागणी असते. विशेषतः मधमाशा अन्न म्हणून पराग एकत्र करतात. त्याचा उपयोग मध उत्पादनासाठी होत असतो. शिवाय पोळ्याच्या बांधकामात आणि दुरुस्तीसाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी देखील मधमाशा झटत असतात. 

मध :

मध हे फुलामधील मधुरसावर शरीरातील विकरांची प्रक्रिया होऊन पोळ्यातील कोठड्यामध्ये साठवून ठेवलेला अन्न साठा आहे. अनेक वर्षांपासून आपण सर्व मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचा वापर करीत आलो आहे. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाशांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते.

मेण :

ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत, त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मधमाशांचे मेण हे कामगार मधमाशांच्या पोटात तयार होणारे नैसर्गिक मेण असून जे स्रावित केल्यानंतर स्केलमध्ये जमा केले जाते. नंतर गोळा केले जाते. मध साठवण्यासाठी आणि पोळ्यातील अळ्यांच्या संरक्षणासाठी मधाचे पोळा बांधण्यासाठी मेणाचा वापर केला जातो. 

परागकण :  

कामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून पोळ्यामध्ये आणले जातात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पराग खायला दिले जातात. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना यांच्या पोळ्यामधील पराग गोळा करून त्यांचा वापर अन्नाबरोबर केला जातो. परागकण फणीच्या कोशांत साठविले जातात आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो.

प्रोपोलिस : प्रोपोलिस हे एक नैसर्गिक रेझिनस उत्पादन असून मधमाशा विविध वनस्पतींमधून गोळा करत असतात. याच प्रोपोलिस पासून पोळे झाडाला चिकटवले जाते. शिवाय ज्या झाडावर मुंग्या आहेत, त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये, यासाठी देखील पोळ्याजवळ येण्याच्या मार्गात प्रोपोलिस पसरून ठेवले जाते. जेणेकरून मुंग्या या चिकट द्रवावर अडकून पोळ्यापर्यंत येत नाहीत. 

रॉयल जेली 

मधमाशी पालनातून रॉयल जेली हे महत्वपूर्ण उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रॉयल जेली हे कामगार मधमाशांच्या ग्रंथीतून निघणारा दुधासारखा स्राव आहे. सुरवातीचे काही दिवस नवजात माशा आहेत, त्यांना रॉयल जेली खायला दिली जाते. तर राणी माशीस प्रौढ अवस्थेपर्यंत रॉयल जेली दिली जाते.  बंद केल्यानंतर या कोशात रॉयल जेली साठवली जाते. ज्यावेळी रॉयल जेली विक्रीसाठी काढण्याच्या वेळी कोषातून बाहेर काढली जाते. यानंतर पुन्हा राणी माशीस पोळ्यात ठेवले जाते. पुन्हा हि प्रक्रिया सुरु होत असते. 

डॉ. नितीन ठोके, वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक

टॅग्स :शेतीनाशिकशेतकरी