बाळासाहेब गणोरकर
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो तो म्हणजे ताज्या कैरीच्या लोणच्याचा.(Homemade Pickle)
आंबट-तिखट चवीने जिभेला पाणी सुटवणारे हे लोणचे केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही, तर ग्रामीण संस्कृतीची गोड परंपराही जपते. (Homemade Pickle)
सध्या कैरीचा हंगाम सुरू होताच मूर्तिजापूर तालुक्यातील घराघरांत लोणचे घालण्याची लगबग वाढली असून, हा एक प्रकारचा ‘उत्सव’च रंगात आला आहे. (Homemade Pickle)
घराघरात लोणच्याचा सोहळा
ग्रामीण भागात लोणचे तयार करणे ही केवळ स्वयंपाकाची प्रक्रिया नसून एक आनंददायी परंपरा आहे.
ताज्या कैऱ्या निवडणे, स्वच्छ धुऊन त्यांचे तुकडे करणे, मीठ-हळद लावून उन्हात वाळवणे आणि नंतर त्यात मोहरीची डाळ, मेथी, हिंग, लाल तिखट आणि शेंगदाणा तेल घालून चविष्ट लोणचे तयार करणे ही संपूर्ण प्रक्रिया उत्साहात पार पडते.
प्रत्येक घरात लोणच्याची चव वेगळी असते. कुठे तिखट जास्त, तर कुठे आंबटपणा अधिक हा 'हाताचा फरक'च घरगुती लोणच्याची खरी ओळख ठरतो.
परंपरेचा सुगंध कायम
आधुनिक जीवनशैलीत अनेक गोष्टी बदलल्या असल्या, तरी ग्रामीण भागातील घरांच्या ओसरीवर उन्हात मांडलेल्या लोणच्याच्या बरण्या आजही परंपरेचे जतन करताना दिसतात.
या लोणच्यांमध्ये घरातील ज्येष्ठांचे अनुभव, कष्ट आणि प्रेम मिसळलेले असते. त्यामुळेच घरगुती लोणचे हे केवळ खाद्यपदार्थ नसून एक सांस्कृतिक वारसा ठरतो.
चव आणि टिकाऊपणाची खासियत
बाजारात विविध ब्रँडची लोणची उपलब्ध असली, तरी घरगुती लोणच्याची चव आणि टिकाऊपणा वेगळाच असतो.
रासायनिक घटकांशिवाय पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे लोणचे वर्षभर टिकते. त्यामुळे ग्राहकांमध्येही घरगुती लोणच्याला विशेष मागणी आहे.
महिलांसाठी उद्योजकतेची संधी
या पारंपरिक कलेला आता उद्योजकतेची जोड मिळू लागली आहे. अनेक महिलांनी घरगुती लोणचे बनवून विक्री सुरू केली असून, त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळत आहे.
लघुउद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळत आहे.
चव, परंपरा आणि आत्मनिर्भरतेचा संगम
घरगुती लोणचे ही केवळ चवीची गोष्ट नसून परंपरा, कुटुंबीयांचे प्रेम आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम आहे.
उन्हाळा आला की या लोणच्याचा सुगंध गावागावांत दरवळतो आणि प्रत्येक घरात हा छोटासा आनंदसोहळा साजरा होतो.
हे ही वाचा सविस्तर : Ranbhaji : तुम्ही खाताय का रानभाज्या? 'या' रोगांवर रामबाण उपाय असलेलं सुपरफूड!
अधिक वाचा : Garlic Farming : लसूण लागवडीत क्रांती! 'या' नव्या पद्धतीने शेतकऱ्याचा जबरदस्त फायदा