Join us

Harbhara Seed Treatment : हरभरा पेरणी बीजप्रक्रिया करूनच करावी, कारण.... जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 16:44 IST

Harbhara Seed Treatment : बीजप्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करावी, असा सल्ला सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

वर्धा : सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम (Soyabean Production) सुरू झाला असून शेतकऱ्यांची रब्बीसाठी हरभरा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. हरभरा पीक रोपावस्थेत असताना यावर मर व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करावी असा सल्ला सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

हरभरा पिकातील (Harbhara Sowing) मर रोग फ्यूजारीय ऑक्सझिस्पोरम या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव होताच झाडाची पाने पिवळी पडून कोमेजतात. झाडाची शेंडे मलूल होऊन हिरव्या अवस्थेतील झाड वाळते. रोप उपटून पाहिले असता मुळे सडलेली दिसतात व सहज उपटून येते. हरभरा पीक रोपावस्थेत असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव होतो.

त्यामुळे याची उपाययोजना म्हणून हरभरा पेरणीच्या आधी ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून शेतात फेकावा. तसेच बीजप्रक्रिया करूच पेरणी करावी असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. नीलेश वझीरे, डॉ. जीवन कतौरे व डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. शिवाय या केंद्रात ट्रायकोडर्मा, रायझोबियम व स्फुरद विरघडविणारे जीवणू विक्रीस उपलब्ध असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

जिवाणू संवर्धके वापरण्याची पद्धत रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारी जीवाणू संवर्धके प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावी. प्रथम १२५ ग्रॅम गूळ प्रति लिटर गरम पाण्यात विरघळून घ्यावा. थंड द्रावणात २५० ग्रॅम प्रत्येक जिवाणू संवर्धन एकत्र करावे. १० किलो बियाण्यास हे मिश्रण पुरेसे आहे. बियाणे ताडपत्री, फरशी किंवा प्लास्टिकवर घेऊन संपूर्ण बियाण्यावर आवरण होईल याप्रमाणे मिसळावे. असे बियाणे सावलीत वाळवावे व त्यानंतर पेरणीसाठी वापरावे. यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो.

अशी करा बीजप्रक्रिया मर, मूळकूज किंवा मानकूज या रोगांपासून नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. अथवा कार्बेन्डॅझिम २५ टक्के मॅन्कोझेब ५० टक्के डब्लूएस या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम, किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्व २-५ किलो, एकर ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात किवा गांडूळ खतामध्ये मिसळून जमिनीत टाकावी.

- कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, जिल्हा. वर्धा 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपेरणीरब्बी