बाळासाहेब माने
राज्यातील हमीभाव केंद्रांवर बारदानाचा तुटवडा निर्माण झाल्याने हरभऱ्याची खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. (Harbhara Kharedi)
मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना हजारो शेतकऱ्यांचा हरभरा अडकला असून, खरेदी होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.(Harbhara Kharedi)
हमीभाव केंद्रांवर बारदान (गोणपाट) उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी ठप्प झाली असून हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
७ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सुमारे ६ हजार शेतकऱ्यांपैकी १,३०० शेतकऱ्यांचा हरभरा अद्याप खरेदीशिवाय शिल्लक आहे. दरम्यान, नोंदणीला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रांवर बारदान नसल्याने व्यवहार बंद पडले आहेत.
खरेदी केंद्रांवर मापच बंद
धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश हमीभाव केंद्रांवर बारदानाचा तुटवडा तीव्र झाल्याने खरेदी प्रक्रिया थांबली आहे.
परिणामी, शेतकरी हरभरा घेऊन केंद्रावर येत असले तरी खरेदी होत नसल्याने परत जावे लागत आहे. 'बारदान नसेल तर खरेदी कशी करायची?' असा प्रश्न केंद्रचालक आणि शेतकऱ्यांना पडला आहे.
मुदतीचा ताण वाढला
नाफेडने हरभरा खरेदीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, उर्वरित खरेदीसाठी अवघे २३ दिवस शिल्लक आहेत.
गेल्या दोन महिन्यांत ज्या गतीने खरेदी झाली नाही, तीच खरेदी आता अल्पावधीत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
आतापर्यंतची खरेदी
एकूण नोंदणी : सुमारे ६,००० शेतकरी
खरेदी पूर्ण : ३,६१० शेतकरी
खरेदी प्रमाण : ७०,३०२ क्विंटल हरभरा
शिल्लक : सुमारे १,३०० शेतकरी
याशिवाय मुदतवाढीनंतर आणखी शेतकरी नोंदणी करत असल्याने ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची अडचण वाढली
उशिरा पेरणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा अद्याप शेतातच आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने काढणीला विलंब होत आहे.
अशा परिस्थितीत खरेदी केंद्रांवर बारदान उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदीची मुदत वाढवण्याबरोबरच सर्व केंद्रांवर तातडीने बारदान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाचे आश्वासन
जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज बाजपेयी यांनी दोन दिवसांत कोलकाता येथून बारदान उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करून ३० एप्रिलपूर्वी हरभरा विक्री पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेरणीचे चित्र
रब्बी हंगामात धाराशिव जिल्ह्यात ज्वारीनंतर हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होते. यंदा सुमारे २ लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली होती.
सुरुवातीचा माल विकला गेला असला, तरी उर्वरित उत्पादन खरेदीअभावी अडकून पडले आहे.
हमीभाव केंद्रांवरील बारदान तुटवडा आणि मर्यादित मुदत यामुळे हरभरा खरेदीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : हरभरा खरेदी रखडली; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर
अधिक वाचा : Chana Procurement : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; 'पणन'कडून हरभरा खरेदीला हिरवा कंदील
Web Summary : Chickpea procurement stalled in Maharashtra due to a shortage of sacks at government centers. Thousands of farmers are affected as the deadline approaches, causing uncertainty. The administration promises to resolve the issue quickly.
Web Summary : महाराष्ट्र में सरकारी केंद्रों पर बोरों की कमी के कारण चना खरीद रुकी। समय सीमा नजदीक आने से हजारों किसान प्रभावित हैं, जिससे अनिश्चितता है। प्रशासन ने जल्द ही समस्या का समाधान करने का वादा किया।