हिंगोली : हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Halad Farming)
वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रात तब्बल पाच लाखांहून अधिक हळदीच्या रोपांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ १ मे रोजी केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.(Halad Farming)
१३ वाणांची रोपे तयार
या प्रकल्पांतर्गत विविध कालावधीत तयार होणाऱ्या १३ वाणांच्या हळदीची रोपे प्रो-ट्रे पद्धतीने तयार केली जात आहेत. हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आगामी खरीप हंगामासाठी ही रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांना प्राधान्य
या रोपांमध्ये कमी, मध्यम आणि जास्त कालावधीत तयार होणाऱ्या वाणांचा समावेश करण्यात आला आहे.
कमी कालावधीचे वाण: सुदर्शना, एनडीएच ८, प्रगती, पितांबर (उच्च उत्पादन व 5% पेक्षा जास्त कुरकुमीन)
मध्यम कालावधीचे वाण: पीडीकेव्ही वायगाव, आर एच 5, फुले हरिद्रा, एसबी 10843
जास्त कालावधीचे वाण: सेलम, रश्मी, रंगा, मेदुकर
या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगली गुणवत्ता मिळण्यास मदत होणार आहे.
१ जूनपासून रोपे उपलब्ध
खरीप हंगाम लक्षात घेऊन ही रोपे १ जूनपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी दर्जेदार रोपे मिळून उत्पादन वाढीस हातभार लागणार आहे.
४७ वाणांचे प्रदर्शन एकाच ठिकाणी
संशोधन केंद्रात भारतातील विविध राज्यांतून संकलित केलेल्या हळदीच्या तब्बल ४७ वाणांचे प्रदर्शनही उभारण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध वाणांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असून योग्य वाण निवडणे सोपे होणार आहे.
हळदीपासून मूल्यवर्धनाचे प्रात्यक्षिक
ओल्या हळदीपासून चिप्स तयार करणे आणि त्यापासून दर्जेदार हळद पावडर बनवण्याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हळदीच्या मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संशोधन केंद्रात अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी केंद्राचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
या उपक्रमामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार आणि उच्च उत्पादन देणारी रोपे उपलब्ध होणार असून उत्पादन वाढीसोबतच उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी खरीप हंगामासाठी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे.
अधिक वाचा : Halad Market : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; हिंगोलीत ६ दिवसांपासून हळद बाजार ठप्प
Web Summary : Turmeric farmers rejoice! Vasmat center produces 13 high-yield turmeric varieties. Seedlings will be available from June 1st, promising increased production and quality. Farmers can also view 47 varieties and learn value addition techniques.
Web Summary : हल्दी किसानों के लिए खुशखबरी! वसमत केंद्र 13 उच्च उपज वाली हल्दी की किस्में तैयार करता है। 1 जून से पौधे उपलब्ध होंगे, जिससे उत्पादन और गुणवत्ता में वृद्धि होगी। किसान 47 किस्मों को देख सकते हैं और मूल्यवर्धन तकनीक सीख सकते हैं।