Join us

Halad Crop Crisis : हळदीत अजूनही ओल; खर्च वाढला, उत्पन्न घटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:17 IST

Halad Crop Crisis : हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळले आहे. सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे हळदीच्या शेतात अजूनही ओल कायम असून, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी उत्पादन निम्म्यावर आलं असून, लागवड खर्चही निघणं अवघड झालं आहे. शेतकरी हतबल, तर दिवाळीचा आनंद ओलसर झालाय. (Halad Crop Crisis)

अरुण चव्हाण

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल १५ दिवस शेतशिवारात पाणी साचून राहिल्याने हळद पिकात करपा व सड यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.(Halad Crop Crisis)

पिकातील ओल कायम राहिल्याने उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली असून, शेतकऱ्यांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे.(Halad Crop Crisis)

अतिवृष्टीने बदलले चित्र

आडगाव रंजे, वसमत आणि औंढा तालुक्यात यंदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चार वेळा मुसळधार पाऊस झाला. ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे-नाल्याकाठच्या जमिनी चिंबून गेल्या, निचरा न झाल्याने हळदीच्या मुळ्यांना सड लागली.

अतिवृष्टी झाल्यानंतर १९ दिवस उलटले तरी शेतात अजूनही ओल कायम आहे. फवारणीसाठी महागडी औषधे वापरली, तरी रोग आटोक्यात आला नाही.

उत्पन्न घटले; गणित बिघडले

सामान्यतः एका एकरातून २० ते २५ क्विंटल हळद उत्पादन मिळते. १२ हजार रुपये क्विंटल दराने, एकरी साधारण २.५ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असते. मात्र यंदा केवळ १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याने उत्पन्न दीड लाखांवर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे.

रोगाचा प्रादुर्भाव करपा, सड, बुरशी

हळदीच्या पिकात ओल कायम राहिल्याने बुरशी वाढली, परिणामी करपा रोगाचा प्रसार झाला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये सड लागल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला असून, हळदीची गुणवत्ता आणि बाजारभाव दोन्हीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे जमिनीतील हवा कमी झाल्याने हळद पिकात मुळसड व बुरशीचा धोका वाढतो.

“पिकातील पाणी लवकर काढून टाकणे, योग्य फवारणी करणे आणि जैविक नियंत्रण वापरणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी रोगनियंत्रणाच्या उपाययोजना वेळेवर कराव्यात,” असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

मेहनत वाया

दोन एकरात हळद लावली. लागवडीपासून औषध फवारणीपर्यंत दीड लाख रुपये खर्च झाला. आता आणखी ५० हजार खर्च होणार आहे. उत्पादन निम्म्यावर आले. एका एकरातून १० ते १२ क्विंटलच उतारा मिळेल. खर्च निघणेही कठीण झाले आहे. - अनिल चव्हाण, शेतकरी, आडगाव रंजे

शेतकऱ्यांची दिवाळी ओलसर

हळद पिकावरचा भरोसा हरवलेला दिसतो. अतिवृष्टी, वाढलेला खर्च आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना यंदा तोट्याचा सामना करावा लागेल.हळद पिकातून वर्षभराचे उत्पन्न मिळते. पण यंदा नुसता खर्च झाला, उत्पादन कमी झाल्याने दिवाळी साजरी करणेही कठीण होणार आहे. -केशवराव राखोंडे,शेतकरी,आजरसोडा, औंढा

हळद पिकाचे अर्थकारण

घटकसरासरी आकडेवारीयंदाची स्थिती
लागवड खर्च१,००,००० प्रति एकर१,५०,००० पर्यंत
सरासरी उत्पादन२०–२५ क्विंटल प्रति एकर१०–१२ क्विंटल प्रति एकर
अपेक्षित उत्पन्न२.५ लाख प्रति एकर१.२ लाख प्रति एकर
नफा१.५ लाखअत्यल्प / तोटा

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : अतिवृष्टीचा फटका! शेतकऱ्यांचा काळवंडलेला कापूस आणि सरकारचा हमीभाव कागदावरच

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक