गडचिरोली : गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुरू होते. गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी गुढी उभारली जाते, तसेच नवनवीन दागिनेदेखील खरेदी केले जातात. या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या साखर गाठीलासुद्धा फार महत्त्व असते. यंदा साखरगाठीचे दर प्रतिकिलोमागे ४० रुपयांनी वधारले.
जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वीच होळी-रंगपंचमीच्या (Holi, Rangpanchami) दिवशी लहान मुलांना साखरगाठी (Sakhar Gatha) भेट देण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. होळी रंगपंचमी व गुढीपाडवा सणानिमित्त साखरगाठी बनविली जात असली तरी हा हंगामी व्यवसाय आहे. यात निवडक लोकच गुंतलेले असतात. जिल्ह्यात आरमोरी येथील देवकुले कुटुंब गत पाच पिढ्यांपासून हा व्यवसाय करीत आहे.
धूलिवंदन सणाच्या पाच ते सहा दिवसांपासून बाजारपेठेत साखरगाठ विक्रीची दुकाने सजलेली असतात. परंतु गाठी तयार करणारे व्यावसायिक मात्र याची तयारी महिनाभरापूर्वीपासूनच करीत असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचेदेखील विशेष महत्त्व आहे. घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून दिला जातो.
देवकुले कुटुंबाचे १५ क्विंटलचे उद्दिष्टआरमोरी येथील देवकुले कुटुंबाचे यावर्षीचे १५ क्विंटल साखरेपासून गाठी बनविण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या गाठीला दोन ते तीन जिल्ह्यात मागणी असल्याचे अनुज देवकुले यांनी सांगितले.
साच्यांमध्ये गाठी होते तयारसाखरगाठी बनविण्यासाठी लाकडी किंवा स्टीलचे साचे वापरले जाते. जिल्ह्यात बहुधा लाकडी साच्यांवरच गाठी तयार केली जाते. या साच्यांवर नक्षीकामाप्रमाणे कलाकृती साकारलेली असते. यामुळे गाठीला विशिष्ट आकार प्राप्त होतो.
... म्हणून वाढले दरसाखर गाठी बनविण्यासाठी पाक तयार करावा लागतो. अनेकजण हा पाक सरपणाच्या आगीवर तर अनेकजण गॅसवर तयार करतात. गॅसवर पाक तयार करण्यासाठी अधिक खर्च येतो. याशिवाय गाठी बनविणाऱ्या रोजंदारांचीही मजुरी वाढलेली आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत किलोमागे ४० रुपयांची वृद्धी झाली.