विष्णू वाकडे
कधीकाळी 'द्राक्षांचे आगार' म्हणून राज्यभरात नावाजलेले कडवंची (Kadavanchi's grape) गाव (ता. जालना) आज कठीण परिस्थितीतून जात आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या द्राक्ष बागांवर आता रोगराईचे सावट आहे. (Grape Farming Crisis)
अपेक्षित उत्पन्न मिळेनासे झाले असून, शेतकऱ्यांचा तोटा वाढत चालला आहे. परिणामी गेल्या पाच वर्षांत गावातील द्राक्ष शेतीचे क्षेत्र १६०० हेक्टरवरून थेट ८५० हेक्टरवर आले आहे.(Grape Farming Crisis)
यशस्वी प्रवास ते आजची घसरण
सन २००६ मध्ये तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सु. ल. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषिरत्न विजय अण्णा बोराडे यांच्या प्रेरणेने गावात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली.
गावात तब्बल ६०० शेततळी उभारण्यात आली.
सिंचनाचे संकट दूर झाले आणि गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड सुरू केली.
द्राक्ष शेतीमुळे शेतकऱ्यांनी आर्थिक उभारी घेतली.
या मेहनतीच्या जोरावर कडवंची गावाला 'द्राक्षांचे आगार' अशी ख्याती मिळाली. मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
वाढते रोग, वाढते संकट
* द्राक्ष बागांमध्ये करपा, भुरी यांसारखे रोग झपाट्याने वाढत आहेत.
* घडजिरणे, काड्यांची वाढ योग्य न होणे, मजुरांची कमतरता या समस्या सतत भेडसावत आहेत.
* या वर्षी मे महिन्यात पडलेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला दिलासा वाटला, पण आता त्याच पावसाचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे.
* काड्या नीट तयार न झाल्याने येत्या हंगामात लागणच होणार नाही का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
उत्पन्न घटले, खर्च मात्र प्रचंड
एका हेक्टर द्राक्ष शेतीसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.
फवारण्या, मजुरी, खते व कीटकनाशके यांच्या खर्चाने शेती तोट्यात गेली आहे.
उत्पन्न कमी, खर्च जास्त झाल्याने अनेक शेतकरी द्राक्ष शेती सोडण्याच्या मार्गावर आहेत.
आता काय हवे?
कडवंची गावाने द्राक्ष शेतीच्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. परंतु, बदलते हवामान, रोगराई, मजूर टंचाई आणि आर्थिक ताण यामुळे शेती संकटात आली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, जर शासनाने धोरणात्मक मदत, तज्ज्ञांकडून वैज्ञानिक मार्गदर्शन आणि कर्जपुरवठ्यात सुलभता उपलब्ध करून दिली, तरच द्राक्ष शेती पुन्हा उभारी घेऊ शकेल.